पडद्यामागचे सूत्रधार : बालाणी कुटुंबीयांचे प्रभागात प्रचार, जनसंपर्काचे नियोजन 

prakash balani
prakash balani

जळगावात भारतीय जनता पक्षाचे फारसे अस्तित्व नव्हते. अगदी उमेदवारही मिळत नव्हते, त्यावेळी 1992 मध्ये भाजपने चिन्हावर प्रथमच पालिका निवडणूक लढविली. त्यात केवळ दोन नगरसेवक निवडून आले. त्यात एक होते भगत बालाणी. यानंतर या कुटुंबाने पालिकेत नगरसेवक म्हणून आजपर्यंत आपला प्रतिनिधी कायम ठेवला. आजही भगत बालाणी भाजपतर्फे उभे आहेत. या कुटुंबांच्या प्रचाराचे नियोजन त्यांचे बंधू प्रकाश बालाणी करीत आहेत. 

शहराच्या राजकारणात भगत बालाणी यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. भाजपतर्फे ते 1992 मध्ये प्रथम पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्येही त्यांना यश मिळाले. भाजपचे शहराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या काळात झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 17 नगरसेवक निवडून आले होते. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले तसेच नगरसेवकपदीही ते निवडून आले. त्यांच्या भावजय स्नेहा प्रेमकुमार बालाणी या सुद्धा राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. भगतभाई यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भावजय कंचन बालाणी भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. मात्र यावेळी भगत बालाणी प्रभाग सोळा "अ' मधून भाजपतर्फे निवडणूक लढवीत आहेत. बालाणी कुटुंबीयांच्या प्रचारासह जनसंपर्काचे नियोजन प्रकाश बालाणी करीत असतात. 
प्रकाश बालाणी यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. मात्र त्यांचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. भगत बालाणी यांनी 1992 मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन स्वत:च केले होते. मात्र त्यानंतर पुढे 1997 पासून प्रकाश बालाणी हेच प्रचाराचे तसेच जनसंपर्काचे नियोजन करीत असतात. स्नेहा बालाणी व कंचन बालाणी यांच्या प्रचाराचे नियोजनही प्रकाश यांनीच केले होते. त्यांना यशही मिळाले. त्यांचे प्रचाराचे नियोजन सूत्रबद्ध असते. ते म्हणतात प्रचारात आपला जनसंपर्कावरच अधिक भर असतो. प्रत्येक घरी जाऊन आपण आपली भूमिका तसेच केलेल्या कार्याची माहिती देतो. त्यामुळे प्रत्येक मतदारांशी आपली वैयक्तिक ओळख होते. शिवाय निवडणुकीनंतरही आपण त्या मतदारांशी संपर्क कायम ठेवतो. त्यांच्या मूलभूत सुविधांबाबत काही समस्या असल्यास त्याची सोडवणूक करतो. आताही त्यांचे बंधू भगत बालाणी भाजपतर्फे प्रभाग सोळा "अ' मधून निवडणूक लढवीत आहे. त्यांच्या प्रचाराचे नियोजनही प्रकाश हेच करीत आहेत. ते म्हणतात, आपण दररोज सायंकाळी प्रचाराबाबत चर्चा करतो. त्यानंतर त्याचे आपण सकाळी नियोजन करून त्यानुसार प्रचार यंत्रणा राबवितो. आता डिजिटल प्रचाराचे युग असले तरी आजही आपण घरोघरी पत्रके वाटण्यावरच अधिक भर देत असतो. कारण व्हॉटसअप तसेच एसएमएसचा प्रचार हा प्रभावी असला तरी मतदार त्यातून जोडला जातोच, असे नाही. असेही त्यांचे मत आहे. मात्र प्रचाराच्या याच नियोजनावर यावेळी आपण यशस्वी होऊ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com