भाजपचे आता "वन बूथ थर्टी यूथ' 

residentional photo
residentional photo

भडगाव : गेल्या निवडणुकीची तयारी करताना भाजपने "वन बूथ टेन युथ' ही संकल्पना राबवून यश मिळविले होते. आता त्याहीपेक्षा अतिसूक्ष्म पद्धतीने नियोजन करीत पक्षाने "वन बूथ थर्टी यूथ' ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. निवडणुकांना अजून अवकाश असतानाच पक्ष मजबुतीसाठी भाजपचा हा प्रयत्न असून, सर्व संबंधित कार्यकर्ते पक्षाने ऑनलाइन जोडून घेतले आहेत. 

हे नियोजन करताना सुरवातीला पक्षाने प्रत्येक बूथसाठी एका बूथप्रमुखाची नियुक्ती केली. त्यानंतर मुंबईच्या "वॉर रूम'मधील प्रशिक्षकांनी या सर्व बूथप्रमुखांचे तालुक्‍याच्या ठिकाणी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले. त्यातून बूथप्रमुखांनी प्रत्येक बूथला प्रत्येकी तीस जण जोडले. सद्यःस्थितीला एका बूथला तीस कार्यकर्ते जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

मतदार कार्यकर्त्याच्या हातात 
जिल्ह्यात एकूण 3 हजार बूथ आहेत. त्या सर्व बूथला प्रत्येकी 30 कार्यकर्ते जोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या कार्यकर्त्यांना त्या त्या बूथचे "जलदूत प्रमुख', "स्वच्छतादूत प्रमुख', "बेटी बचाव बेटी पढाव प्रमुख', "मुद्रा लोन प्रमुख', "संजय गांधी निराधार योजना प्रमुख', अशी विविध 11 नावे दिली जाणार आहेत. उर्वरित कार्यकर्त्यांना "एक पेज एक कार्यकर्ता'ची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यांच्या हातात आपल्या बूथवरील मतदार यादीतील प्रत्येकी एका पानावरील सर्व मतदारांशी संपर्काची जबाबदारी सोपविली जाणार आहे. ही सर्व रचना येत्या 20 एप्रिलपर्यंत पूर्णत्वास येणार आहे. 

"ऑनलाइन नेटवर्क' 
आतापर्यंत भाजपचे बूथप्रमुख नेमण्याचे काम हे कागदावर राबविले जायचे. पण, आता पक्षाने हे सर्व बूथप्रमुख व कार्यकर्त्यांची आपल्या ऑनलाइन नेटवर्कशी जोडणी केली आहे. त्यासाठी पक्षाने एक स्वतंत्र ऍप विकसित केले आहे. ज्याला बूथप्रमुख म्हणून नेमले आहे, त्याची सर्व माहिती या ऍपमध्ये नोंदली जाते. त्यानंतर संबंधिताला मोबाईल नंबरवर ओटीपी नंबर जातो. संबंधितांना अचानक मुंबईच्या "वॉर रूम'मधून संपर्कही केला जात आहे. 

पूर्ण वेळ विस्तारक 
भाजपने राज्यातील बूथप्रमुखांचे संपूर्ण नेटवर्क हाताळण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी पूर्णवेळ विस्तारकाची नेमणूक करण्यात आली आहे. विस्तारक या सर्व बाबींचा सातत्याने पाठपुरावा करत असतो. प्रदेशस्तरावरून थेट मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष हे एकाचवेळी या बूथप्रमुखांशी व बूथवरील 30 कार्यकर्त्यांशी मोबाईलवर बोलू शकतात, हे विशेष. 


विरोधक आंदोलनातच मग्न 
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस हे भाजपचे विरोधक वेगवेगळ्या आंदोलनात मग्न होऊन केवळ सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत; तर दुसरीकडे भाजप त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी पक्ष संघटनेत नेटवर्क सक्षम करण्यात लागला आहे. यामुळे बूथमध्ये पक्षाची स्थिती काय राहील, याचा अंदाज पक्षाला सहज काढता येणार आहे. यामुळे इतर पक्षांसमोर यापुढेही भाजपचे आव्हान तगडेच राहील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 


पक्ष बांधणीचे भाजपचे सूक्ष्म नियोजन आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व तीन हजार बूथशी प्रत्येकी 30 कार्यकर्ते जोडण्यात आले आहेत. त्यांच्यावर निवडणूक होईपर्यंत शासनाच्या विविध योजना घराघरांत पोचविण्याची जबाबदारी असणार आहे. 
 उदय वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com