स्टेट बॅंकेसमोर स्कार्पिओतील वीस लाखांवर मारला डल्ला 

स्टेट बॅंकेसमोर स्कार्पिओतील वीस लाखांवर मारला डल्ला 

स्टेट बॅंकेसमोर स्कार्पिओतील वीस लाखांवर मारला डल्ला 


जळगाव ः सत्रासेन आश्रमशाळेचे वीस लाख रुपये स्कार्पिओ गाडीतून लांबविणारी टोळी ही आंध्र प्रदेशातील "बिटरगुंटा गॅंग' असल्याचा संशय असून, हे चोरटे सीसीटीव्ही कॅमऱ्यातही कैद झाले आहेत. या टोळीची रक्कम लांबविण्याची पद्धत आजच्या घटनेत तंतोतंत वापरली गेल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. 

आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष रायसिंग फुगा भादले यांचे मागील महिन्यात निधन झाले. तेव्हापासून भादले कुटुंबीय धार्मिक विधीत गुंतलेले होते. आश्रमशाळेतील किराणा माल आणि इतर उधाऱ्या वाढल्याने आज बॅंकेतून पैसे काढून संचालक रवींद्र भादले व्यापाऱ्यांचा पैसा देण्यासाठी जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच चोरट्यांनी त्यांच्या वीस लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. 

गेल्या वर्षीही आंध्र प्रदेशातील "बिटरगुंटा' गॅंगने धुमाकूळ घातला होता. व्यापारी प्रतिष्ठाने, हवालाची देवाणघेवाण चालणारे ठिकाण, मोठ्या बॅंकांच्या बाहेर पाळतीवर असणाऱ्या या टोळीतील 4-5 सदस्य नियोजनबद्धरीत्या सावज हेरतात. टोळीतील एक जण बॅंकेच्या कॅश काऊंटरवर असतो. मोठी रक्कम काढणाऱ्याची रेकी केल्यावर तो बाहेर थांबलेल्या चोरट्यांना निरोप देतो. त्यानुसार पूर्वीपासूनच तैनातीवर असलेले चोरटे केवळ शर्टाचा रंग व वर्णनावरून सावज टिपतात. संबंधित व्यक्ती गाडीत बसल्यावर टोळीतील दुसरा दहा रुपयांच्या नोटा रस्त्यावर विखुरतो. नंतर लहानगा मुलगा धावत येऊन पैसे पडल्याचे सांगून निघून जातो. पैसे उचलण्यासाठी गाडीतील व्यक्ती खाली उतरताच बॅग लंपास होते. गेल्यावर्षी शहर पोलिस ठाण्याचे दुष्यंत खैरनार यांनी आयसीआयसीआय बॅंकेबाहेर झडप घालून या टोळीला पकडले होते. स्थानिक गुन्हे शाखा या टोळीच्या मागावर आंध्र प्रदेशातही जाऊन आली. मात्र गुन्ह्यातील रिकव्हरी मिळू शकली नाही. 

पकडल्यावरही पोलिसांना अडचण 
पोलिसांनी चोरट्यांना पकडलेच, तर पकडणारा पोलिस ठाण्यातच जीभ चावून घेत रक्ताच्या उलट्या करून डोळे वर चढवून बेशुद्ध पडतो. कोणी उलटी तर कुणी पोलिसांच्या तावडीत सापडताच संडासही करून देतो, तर कोणी भिंतीवर डोके आपटून घेतो. अर्थात या सर्व प्रकारातून पोलिसांत त्यांना भीती निर्माण करायची असते. हिंदी समजत असतानाही हे गुन्हेगार पकडले गेल्यावर "काहीच समजत नाही', असा आव आणतात. कितीही मारले तरी ते गुन्हा कबूल करीत नाहीत. 
..... 

इन्फोबॉक्‍स 
नऊ दिवसांपूर्वी लॅपटॉप लंपास 
गेल्या 9 एप्रिलला सायंकाळी सातच्या सुमारास जैन इरिगेशनचे व्यवस्थापक पनीर सेल्वम मुनियान्डी हे मित्र अभयकुमार बऱ्हाटे (रा. मुंदडानगर) जात असताना नवीपेठेतील गणेश मंदिरासमोर बऱ्हाटे पाणीपुरी घेण्यासाठी कार थांबवून खाली उतरले. मागील सीटवर लॅपटॉपची बॅग असल्याने पनीर सेल्वम कारमध्येच बसून होते. दहा, बारा वर्षांचा मुलगा कारजवळ आला व "तुम्हारे पैसे निचे गिरे है', असे सांगत तो निघून गेला. बऱ्हाटे यांच्या खिशातील पैसे पडले की काय, म्हणून सेल्वम यांनी खाली उतरून पाहिले असता दहा रुपयांच्या चार नोटा खाली विखुरलेल्या अवस्थेत पडून होत्या. ते खाली उतरून पैसे उचलत नाहीत, तोवर कारच्या मागील सीटवरून लॅपटॉपची बॅग घेत चोरट्यांनी पोबारा केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com