पदवी प्रमाणपत्राचे होणार डिजिटल सुरक्षा संचयन 

residentional photo
residentional photo

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी (एनएडी)अंतर्गत आपल्या पदवी प्रमाणपत्राची त्वरित नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक प्रा. ए. बी. चौधरी यांनी केले आहे. 

भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने डिजिटल इंडिया अंतर्गत नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी (NAD) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये आपल्या पदवी प्रमाणपत्राचे डिजिटल सुरक्षा संचयन होणार असून प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याचे डिजिटल शैक्षणिक प्रमाणपत्राचे स्वप्न साकार होणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गतवर्षी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या पुढाकाराने यासाठी एनएसडीएल या कंपनी समवेत सामंजस्य करार केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र घेतलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीबाबतची माहिती प्रभारी संगणक केंद्र प्रमुख व पद्धती विश्‍लेषक डॉ. विनोद पाटील यांनी दिली. 
 
अशी आहे प्रक्रिया 
विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना होम पेजवर असलेल्या डिग्री सर्टिफिकेशन डिपॉझिटरी (NAD) या लिंकवर क्‍लिक करून आपली नोंदणी करता येणार आहे. आधार कार्ड असलेल्या व या आधार कार्डशी जो भ्रमणध्वनी क्रमांक लिंक केलेला असेल त्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल व त्याचा वापर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी त्यात एनएडी आयडी क्रमांक विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. त्यानंतर तो आयडी क्रमांक विद्यार्थ्यांनी convocation@nmu.ac.in वर ई-मेल करावा. विद्यापीठास कळविल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे डिजिटल स्वाक्षरीचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना देखील नोंदणी करता येणार असून त्या विद्यार्थ्यांना नोंदणीच्या वेळी आपला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. 
 
"एनएडी'अंतर्गत नोंदणी अनिवार्य 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तीन लाख विद्यार्थ्यांनी आजवर पदवी प्रमाणपत्र नेलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे. दहावी व बारावीच्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना देखील आपल्या प्रमाणपत्राची नोंदणी या अंतर्गत करता येणार आहे. या सुविधेमुळे डिजिटल व ऑनलाइन प्रमाणपत्र सुरक्षित राहणार असून प्रमाणपत्राची प्रत विद्यार्थ्यांना स्वत: जवळ बाळगण्याची गरज भासणार नाही. कायमस्वरूपी प्रमाणपत्राचे रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com