गणेश मंडळांतील तरुणाईचे उमेदवारांना बळ 

गणेश मंडळांतील तरुणाईचे उमेदवारांना बळ 

जळगाव : मुंबई, पुण्यासारख्या महापालिकांच्या सभागृहातील मार्ग गणेश मंडळातून जातो, असे म्हटले जाते. गणेश मंडळाचे कार्यकर्ते पुढे जाऊन नगरसेवक होतात, असा त्याचा अर्थ. अन्य शहरांमध्ये आणि अगदी जळगावातही तसे प्रत्यक्ष नसले तरी गणेश मंडळांशी संबंधित अनेक कार्यकर्ते उमेदवार म्हणून तर रिंगणात आहेतच. शिवाय, मंडळांमधील हजारो तरुणांची फौजही काहींनी आपल्या प्रचारार्थ सोबत घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 
सार्वजनिक गणेशोत्सव हा एक धार्मिक उत्सव असला तरी त्यानिमित्त अनेक रचनात्मक सामाजिक कार्ये उभी राहत असतात. शिवाय हा उत्सव समाजाला संघटित करण्याचा, समाजातील तरुणाईला नेतृत्वविकासाची दिशा देणारा, सामाजिक व प्रबोधनपर देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करणारा उत्सव मानला जातो. या उत्सवातून तरुणाईतील अनेक कलागुण समोर येत असतात, त्याला विविध पैलू पडत असतात. आणि त्या माध्यमातून भविष्यातील विविध क्षेत्रातील नेतृत्व विकसित होत असते. गणेशोत्सवात सहभागी विविध मंडळांचे कार्यकर्ते पुढे जाऊन राजकारण, समाजकारण तसेच विविध क्षेत्रांतील नेतृत्व बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे गणेश मंडळांचे महत्त्व आजही कायम आहे. 

निवडणुकांचा काळात विशेष लक्ष 
कोणत्याही निवडणुकांचा काळ असला, की तरुणाईची तयार "फौज' म्हणून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे पाहिले जाते. जळगावसारख्या पाच-साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरातही सुमारे आठशेवर गणेश मंडळे व हजारो कार्यकर्ते त्यात सक्रिय आहेत. शिवाय आता महापालिका निवडणुका असल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून तीनशेवर उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या उमेदवारांची नजर बरोबर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर खिळली आहे. 

उमेदवारांचे गणेशभक्तांना साकडे 
गणेशोत्सवात सहभागी तरुणाई ज्या उमेदवाराच्या मागे, अथवा सोबत आपले बळ लावले, त्याचा विजयाचा मार्ग सुकर होतो, असे मानले जाते. त्याच आधारे अनेक उमेदवार आपापल्या प्रभागातील गणेश मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मदतीसाठीचे साकडे घालताना दिसत आहेत. जळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. गणेश मंडळांनी पालिका सभागृहाला अनेक सदस्य दिले असून त्यातून त्यांनी शहराचे नेतृत्व विकसित केले आहे. याची पूर्ण जाणीव असल्याने प्रभागातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते, त्यांची मदत मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत. 

मंडळांना देणगी 
दोन महिन्यांनी गणेशोत्सव आहे. त्याआधी महापालिका निवडणूक होत असल्याने मंडळांची संध्या "चांदी' असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवाराला गणेशभक्तांनी मदत केली तर त्या मंडळाला मोठी देणगी देण्याची ग्वाही उमेदवारांकडून दिली जात आहे. अर्थात त्या-त्या भागातील नगरसेवक, राजकीय नेतृत्वाकडून गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात मदत होतच असते. काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे स्वत:चे मोठे मंडळ आहे. 


विसर्जन मिरवणुकीचा जळगाव "पॅटर्न' 
जळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्रमुख आकर्षण म्हणजे शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक प्रयोग, उपक्रम राबविणारी ही मिरवणूक राज्यात आदर्श ठरली आहे. हजारो गणेशभक्त अत्यंत शिस्तीने या मिरवणुकीत दरवर्षी सहभागी होतात, लेझीम- ढोल-ताशे पथक, थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करतात. लाखो भक्त ही मिरवणूक पाहायला येतात. त्यातून तरुणाईच्या नेतृत्वाचेही दर्शन घडत असते. म्हणूनच गणेश मंडळे उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. 
 
शहरातील गणेश मंडळे : सुमारे 800 
मंडळाची कार्यकारिणी : प्रतिमंडळ 30 
एकूण मंडळांचे सदस्य : सुमारे 2500 
मंडळामागे राबणारे कार्यकर्ते : सुमारे 12,000 

 
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहरातील सर्व गणेश मंडळांना एकत्रित करण्याचे माध्यम आहे. हा पवित्र उत्सव चैतन्य, ऊर्जा, सामाजिक व सांस्कृतिक कार्य, नेतृत्वविकासाचा उत्सव व्हावा म्हणून महामंडळ कार्यरत असते. त्यातूनच विसर्जन मिरवणुकीचा "जळगाव पॅटर्न' आम्ही विकसित करु शकलो. भविष्यातही गणेश मंडळ व महामंडळाच्या माध्यमातून रचनात्मक कार्य उभे करण्याचा मानस आहे. 
- सचिन नारळे (अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com