जैन-महाजन दोस्ती अन्‌ भाजप-सेनेत "नुरा कुस्ती' 

जैन-महाजन दोस्ती अन्‌ भाजप-सेनेत "नुरा कुस्ती' 

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मात्र, शिवसेना नेते सुरेशदादा जैन आणि भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची दोस्ती आहे. त्यांनी निवडणुकीतही काही उमेदवारांविरुद्ध सोयीचे उमेदवार दिले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही नेत्यांची "नुरा कुस्ती' आहे काय? असा प्रश्‍न जनतेत निर्माण झाला आहे. 
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व समाजवादी आघाडी हे प्रमुख पक्ष मैदानात आहेत. मात्र, सद्यःस्थितीत शिवसेना आणि भाजप यांच्यातच लढत होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेवर सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, तर भाजप महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

खडसे-जैन संघर्षाची परंपरा 
या अगोदर भाजपचे नेतृत्व एकनाथ खडसे यांच्याकडे होते. खडसे व जैन एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याने काट्याची लढत होत असे. मात्र, यावेळी भाजपचे नेतृत्व गिरीश महाजन करीत आहेत. जैन व महाजन यांची मैत्री असल्याचे कुठेही लपून राहिलेले नाही. त्यामुळे दोघांनीही निवडणुकीत पक्षाची युती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपमधून जोरदार विरोध झाल्याने महाजन यांनी माघार घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. 

जैनांचे निष्ठावंत भाजपमध्ये 
जैन यांना सोडून काही विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे अनेक नगरसेवक जैन यांचे निष्ठावान होते. ते अचानक भाजपमध्ये कसे दाखल झाले? अन्‌ लगेच त्यांना उमेदवारी कशी मिळाली, याबाबतचा संभ्रम आजही जनतेच्या मनात आहे. त्यातच दोन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारयादीत अनेक ठिकाणी समन्वयाने लढत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येऊन जैन यांच्या गटातून आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे या शंकेला बळ मिळाल्याची भाजप कार्यकर्त्यांत चर्चा आहे. 

खडसे "नामानिराळे' 
या सर्व राजकीय घडामोडींत भाजपचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे मात्र "नामानिराळे' आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उमेदवार जाहीर होण्याच्या प्रक्रियेत त्यांचा कोठेही सहभाग नव्हता. त्यांच्याच काही समर्थकाविरुद्धही शिवसेनेकडून पक्‍के उमेदवार देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकीकडे भाजप-सेना आमने-सामने लढत आहे. दुसरीकडे जैन व महाजन यांची दोस्ती आहे. दोन्हीही नेते त्यांचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी दिलेल्या उमेदवारीमुळे ही निवडणूक "नुरा कुस्ती'आहे काय? असा प्रश्‍न अद्याप तरी जनतेच्या मनात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com