पडद्यामागील सूत्रधार : "एमबीए'चे धडे प्रचाराच्या व्यवस्थापनातही उपयोगात

पडद्यामागील सूत्रधार : "एमबीए'चे धडे प्रचाराच्या व्यवस्थापनातही उपयोगात

पंकज काळे. माजी नगराध्यक्ष दांपत्य पांडुरंग ऊर्फ बंडूदादा काळे यांचे पुत्र. आई-वडील राजकारणात. मात्र, पंकज यांचे मन त्यात रमले नाही, त्यांनी उच्च शिक्षण घेत एमबीएची पदवी संपादन केली. आता या पदवीनंतर ते व्यवसायातील व्यवस्थापन तर बघत आहेतच, शिवाय गेल्या पंधरा वर्षांपासून काळे परिवारातील सदस्यांच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापनही सांभाळत आहेत. आणि प्रत्येकवेळी त्यात त्यांना उल्लेखनीय यशही मिळत आहे. 
 
पांडुरंग काळे यांचे पालिकेच्या राजकारणात तीस- पस्तीस वर्षांपासून नाव घेतले जाते. 1985 ते 1995 अशी दहा वर्षे ते पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून सुरेशदादा जैन यांच्या कट्टर समर्थकाच्या रूपात कार्यरत होते. 1995मध्ये प्रथमच त्यांनी पालिका निवडणूक लढली आणि ते जिंकलेही. त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये ते नगराध्यक्ष झाले व नंतरच्या काळात त्यांनी पत्नी सुधा यांनाही राजकारणात आणले. त्यादेखील सलग दहा वर्षे पालिकेच्या सदस्या होत्या व त्यांनाही नगराध्यक्षपद मिळाले. एकाच कुटुंबात दोन नगराध्यक्ष झाल्याचे जळगावातील हे एकमेव उदाहरण असावे. 

शिक्षणानंतर सांभाळली जबाबदारी 
2003ला जळगाव महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हापासून बंडूदादांच्या प्रचाराचे नियोजन त्यांचे पुत्र पंकज यांच्याकडे आले. तोपर्यंत पंकज यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली होती. "एमबीए'तील व्यवस्थापनाच्या धड्यांचा त्यांनी वडिलांच्या प्रचाराच्या नियोजनात बऱ्यापैकी उपयोग करून घेतला. 

संपर्क, संवादावर दिला भर 
बंडूदादा ज्या परिसरातून निवडून येतात, त्या प्रभागाचा सूक्ष्म अभ्यास करून, तेथील समस्या जाणून घेत सुरवातीपासून त्या समस्यांवर काम करण्याचा पंकज यांचा प्रयत्न होता. प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, संवाद साधणे, त्यांच्यात मिसळून त्यांचे प्रश्‍न जाणून घेणे ही सर्व कामे पंकज यांच्याकडेच आहेत. त्यांच्या प्रभागात झोपडपट्टीचा परिसरही समाविष्ट असून दुसऱ्या बाजूला शिक्षित, उच्चशिक्षित व प्रतिष्ठित नागरिकांचाही भाग आहे. दोघा घटकांचे प्रश्‍न वेगळे. ते जाणून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठीही पंकज यांचा प्रयत्न असतो. 

व्यवस्थापनाचे तंत्र-मंत्र 
एकीकडे हॉटेलचा व्याप वाढलेला व्यवसाय आणि दुसरीकडे प्रचाराचे नियोजन. दोन्ही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उत्तम व्यवस्थापन गरजेचे. मात्र, दोन्ही क्षेत्रांचे व्यवस्थापन, त्यातील तंत्र-मंत्र वेगवेगळे. असे असूनही या दोन्ही क्षेत्रांत काळे परिवाराला यश मिळवून देताना पंकज यांनी त्यांच्या पदवीचा, त्यातील अनुभवाचा अत्यंत योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला. यावेळी बंडूदादा अथवा सुधा काळे रिंगणात नाहीत. मात्र, पंकज यांचे बंधू अमित, वहिनी दीपमाला काळे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंकज रात्रीचा दिवस करून नियोजनात गुंतले आहेत. लोकांशी व्यक्तिगत संपर्क, संवाद आणि त्या माध्यमातून कुटुंबीयांचा प्रचार सुरू आहे. कार्यकर्ते, मित्रपरिवाराला मतदान बाहेर काढण्यासाठी त्यांनी सज्ज करून ठेवले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही काळे परिवार पालिका सभागृहात आपले सदस्य देण्यास उत्सुक असेल.. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com