फिटनेस फंडा : नियमित व्यायामामुळे संदीपभय्या तंदुरुस्त 

फिटनेस फंडा : नियमित व्यायामामुळे संदीपभय्या तंदुरुस्त 

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सार्वजनिक जीवनात कार्य करताना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील हे याबाबत खूपच जागरूक. एकाच वेळी शैक्षणिक संस्थांचा मोठा व्याप आणि जिल्ह्यातील राजकारण अशा दोन्ही घटकांवर काम करताना नियमित दिनचर्येत पहाटे उठून चालणे, जिममधील व्यायाम आणि संतुलित आहाराच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. 
 
चो पडा तालुक्‍यातील रहिवासी असलेले ऍड. संदीप पाटील हे जिल्ह्याला सुपरिचित व्यक्तिमत्त्व. मितभाषी, मनमिळावू स्वभावाच्या संदीपभय्यांकडे पाहिल्यावर त्यांना कुणी राजकारणी म्हणणार नाही. कुटुंबाचा वारसा म्हणून ते कॉंग्रेसी आहेत, आणि आज जिल्हाध्यक्ष म्हणून कॉंग्रेसची धुराही सांभाळत आहेत. शैक्षणिक संस्थांचा व्याप आणि कॉंग्रेसची जबाबदारी सांभाळताना त्यांची नक्कीच दमछाक होत असेल. कारण जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होणे, सोपी गोष्ट नाही हा आजवरचा अनुभव. तरीही संदीपभय्यांनी शरीर व मनाचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल होऊ दिलेला नाही. 
पहाटे साडेपाचला उठणे, त्यानंतर गरम पाणी पिऊन बाहेर पडणे, महाविद्यालयातील 400 मीटरच्या ट्रॅकवर 5 राउंड, म्हणजे सुमारे 2 किलोमीटरचे चालणे. नंतर तासभर महाविद्यालयाच्या जिममध्ये हलका व्यायाम, योगासने, प्राणायाम करायचा, हा ऍड. पाटलांचा नित्यक्रम. न चुकता ते या शेड्यूलचे तंतोतंत पालन करतात. सकाळी आठला तयार होऊन आल्यानंतर घरगुती नाश्‍ता व चहा. नाश्‍त्यात प्रामुख्याने उसळ, इडली-डोसा, थालीपीठ, दशम्या. सकाळी नऊला कार्यालयीन व पक्षांतर्गत कामांसाठी बाहेर पडल्यानंतर दुपारपर्यंत ती कामे करायची. पक्षाच्या बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, संघटनात्मक कार्यक्रम, मेळाव्यांना उपस्थिती. सोबतच संस्थांच्या विविध कामांवर लक्ष देणे, ज्या संस्थांवर संचालक आहेत त्या ठिकाणच्या बैठका व अन्य कामे आटोपायची. दुपारी एक ते दोनदरम्यान वरण-भात, भाजीपोळी, भाकरी हे जेवण घ्यायचे. तेलकट, बाहेरचे पदार्थ शक्‍यतो टाळायचे. बाहेरगावी असताना घरूनच डबा सोबत न्यायचा. बाहेर जेवायची वेळ आली तर हिरव्या भाज्यांवर भर. सायंकाळी पाचला चहा-बिस्कीट. रात्री आठ ते नऊदरम्यान हलके भोजन, असा संदीपभय्यांचा रोजचा कार्यक्रम. 

कथा, कादंबरीचे वाचन 
शारीरिक स्वास्थ्याची जेवढी काळजी संदीपभय्या घेतात तेवढेच ते मानसिक स्वास्थ्याचीही निगा राखतात. प्राणायामातून बऱ्यापैकी मनःस्वास्थ्य लाभते, असा त्यांचा दावा आहे. वाचनाची आवड असल्याने कथा, कादंबऱ्या वाचण्यावर त्यांचा भर असतो. त्यातून एकाग्रता वाढते व आवडलेले वाचल्याने कामाचा उत्साही वाढतो, असे ते म्हणतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com