जिल्ह्यात 12 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना

residentional photo
residentional photo

जळगाव ः शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढेल या हेतूने जिल्ह्यात बारा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. आतापर्यंत अनेक शेतकरी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून देण्यास सुरवात केली आहे. काही कंपन्यांनी खते, बियाणे, शेती अवजारे शेतकऱ्यांना विक्रीस सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात शेतीसाठी लागणारे घटक मिळण्यास मदत सुरू झाली आहे. अनेक कंपन्यांना संबंधित युनिटचे अनुदान मिळाले. मात्र विजेचे संयोजन नसल्याने प्रत्यक्ष उत्पादन करण्यास या कंपन्या असमर्थ ठरत आहेत. 

गटशेतीमुळे शेतकरी त्यांचा शेतीमाल शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विकतात. बाजारपेठेत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबून, शेतकऱ्यांच्या मालाला दर जादा मिळतो. जिल्ह्यात गटशेतीची संकल्पना तीन वर्षापासून सुरू झाली. अनेक शेतकरी गट एकत्र येऊन त्यांनी शेतकरी कंपनीची स्थापना केली. जिल्ह्यात तेरा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. त्यातील बारा कंपन्यांना साडेअकरा लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. त्यांनी मका ड्राईंग युनिट, धान्य स्वच्छता व प्रतवारी, दालमिल, हळद उबाळणी व पावडर युनिट, बनाना रायपनिंग चेंबर आदी युनिटसाठी लागणारे साहित्य आणले आहे. साहित्याची मांडणी केली. मात्र विजेच्या संयोजनासाठी लागणारा निधी उत्पादक कंपन्यांकडे नसल्याने प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शकलेले नाही. "नाबार्ड'च्या माध्यमातून शेतकरी गटाच्या या कंपन्यांना अनुदान मिळाले. प्रत्यक्ष उत्पादन करण्यास मात्र विजेच्या संयोजनासाठी आर्थिक तरतूद "आत्मा'ने करावी अशी मागणी उत्पादक कंपन्यांची आहे. 
 
शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यवसायाचे स्वरूप ः 
धान्य स्वच्छता, प्रतवारी केंद्र व दालमिल ः स्वावलंबन शेतकरी उत्पादक कंपनी (धाबेपिंप्री, ता. मुक्ताईनगर), जागमाता ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनी (जवखेडा, ता.अमळनेर), चोपडा फार्मसी प्रोड्युसर कंपनी (अकुलखेडा, ता.चोपडा) 
धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र ः मोहाडी फामर्स प्रोड्युसर कंपनी (नेरी, ता.जामनेर), अंजनीखोरे फार्मसी प्रोड्युसर कंपनी (फरकांडे, कासोदा ता. एरंडोल), धनाई पुण्याई ऍग्रो फार्मसी प्रोड्युसर कंपनी (बहादरपूर, ता. पारोळा), बियानो फार्मसी प्रोड्युसर कंपनी (लोणीपिराचे, कजगाव, ता. भडगाव). 
मका ड्रायींग युनिट ः डेव्हलपमेंट ऍग्रो व्हीजन फार्मसी प्रोड्युसर कंपनी (टाकरखेडा, ता. अमळनेर), संत चांगदेव तापीपूर्णा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (चांगदेव) 
मका प्रक्रिया व दालमिल ः सदगुरू फार्मसी प्रोड्युसर कंपनी (चिनावल, ता. रावेर). 
हळद उबाळणी व पावडर युनिट ः कष्टकरी फार्मसी प्रोड्युसर कंपनी (खिरवड, ता. रावेर). 
बनाना रायपनिंग चेंबर ः चिनावल फार्मसी प्रोड्युसर कंपनी (चिनावल, ता. रावेर). 
 
वाघोड येथील कष्टकरी फार्मसी प्रोड्युसर कंपनीतर्फे ओली हळद उबाळून हळकुंड बनविण्यासाठी बॉयलर आम्ही घेतले आहे. हळद क्रशर मशिनची ऑर्डर दिली आहे. ती आल्यानंतर हळकुंड तयार करून पॉलिश केली जाईल. पॅकिंग करून नंतर ते विक्रीस आणल्या जातील. 
गुणवंत सातव शेतकरी कंपनीप्रमुख 
 
गटशेतीच्या माध्यमातून आम्ही तेरा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. त्यातील बारा कंपन्यांना प्रत्येकी साडेअकरा लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. एक कंपनीचे काम प्रगतिपथावर आहे. कंपन्यांना विजेच्या संयोजनासाठी निधीची अडचण आहे. ती सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
शिवाजी आमले, प्रकल्प संचालक "आत्मा' 

आकडे बोलतात... 
शेतकरी कंपन्या--12 
समाविष्ट गटसंख्या--305 
सभासद संख्या--4 हजार 390 
अर्थसहाय्यवाटप--1 कोटी 16 लाख 50 हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com