मागण्यापेक्षा चार जणांना नोकरी देण्याची धमक ठेवा : गुलाबराव पाटील

live photo
live photo

जळगाव : करिअर निवडायचे असेल तर मार्गदर्शन जरूर घ्या. मात्र, आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे ते आधी ठरवा. नुसतेच उच्चशिक्षण घेऊन चार ठिकाणी नोकरी मागण्यापेक्षा आजच्या तरुणांनी चार जणांना नोकरी देण्याची धमक ठेवावी, असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. 
"सकाळ'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन'तर्फे आजपासून लाडवंजारी समाज सभागृहात आयोजित "समर यूथ समिट'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे महापौर ललित कोल्हे, "समिट'चे मुख्य प्रायोजक असलेल्या स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, "यिन'चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी, "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, युनिट मॅनेजर संजय पागे उपस्थित होते. 

समाजाचे पुस्तक वाचा 
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या "समिट'चे उद्‌घाटन झाल्यानंतर तरुणाईस मार्गदर्शन करताना श्री. पाटील म्हणाले, की जीवनात वाचनाला महत्त्व आहे. मात्र, त्यासाठी केवळ पुस्तकेच वाचली पाहिजेत, असे नाही. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उच्चशिक्षण न घेताही राजकीय शिक्षणात मंत्रिपदापर्यंत पोचला. त्यासाठी समाजाचे वाचन केले पाहिजे. त्यातून बरेचकाही शिकण्यासारखे असते. आमच्यावेळी पाच वह्यांमध्ये वर्षभराचे शिक्षण व्हायचे. आता दहावी उत्तीर्ण होताच हाती 14 हजारांचा मोबाईल असतो. "सकाळ'सारखा समूह नेतृत्वविकासाच्या चार गोष्टी सांगतो. अशा सुविधा असताना तरुणाईने किती प्रगती केली पाहिजे? व्यवसाय, उद्योग कोणताही करा. मात्र, चोरी-चपाटीपासून दूर राहून. करिअर करताना मार्गदर्शन जरूर घ्या. मात्र, आपल्याला जे आवडेल तेच करिअर निवडा, असे सांगत गुलाबराव पाटलांनी तरुणांची मने जिंकली. 
 

सुरवातीला अनिता पाटील यांच्या ग्रुपने योगावर आधारित अप्रतिम कलाविष्कारासह गणेशवंदना सादर केली. मान्यवरांच्या स्वागतानंतर "समिट'चे उद्‌घाटन करण्यात आले. निवासी संपादक विजय बुवा यांनी प्रास्ताविकात "सकाळ' व "यिन'च्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेत "यूथ समिट'मधील विविध सत्रे, त्यांच्या उपयुक्ततेबद्दल माहिती दिली. उद्‌घाटन सत्राचे सूत्रसंचालन मोहिनी सोनार व किशोर निकम यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या "समिट'मध्ये जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सुमारे पाचशेवर महाविद्यालयीन तरुण- तरुणी सहभागी झाले आहेत. 
 
दिशादर्शक उपक्रम : सुनील पाटील 
तत्पूर्वी, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या "समिट'च्या निमित्ताने तीन वर्षांपासून "यिन'सोबत काम करण्याची संधी मिळत असल्याचे सांगून ते म्हणाले, की राज्यातील तरुणाईसाठी हा उपक्रम दिशादर्शक आहे. अशा उपक्रमांमधून उद्याचे यशस्वी उद्योजक, व्यावसायिक, विविध क्षेत्रांतील नेतृत्व विकसित होत आहे. 
 
मार्गदर्शक, प्रेरणादायी उपक्रम : ललित कोल्हे 
"सकाळ'चे उपक्रम समाजासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असतात. तरुणांमध्ये आत्मविश्‍वास, नेतृत्वविकास घडविणाऱ्या या उपक्रमाबद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्ष "समिट'मध्ये सहभागी तरुणांच्या उत्साहात आम्हालाही सहभागी होता आले, याचा आनंद आहे. राजकारणातच नव्हे; तर अन्य कुठल्याही क्षेत्रांत नेतृत्व करायचे असेल, तर अशा प्रकारच्या कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन निश्‍चितच उपयुक्त ठरतील, अशा शब्दांत महापौर ललित कोल्हे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 

तरुणांनी शेतकरी व्हावे 
शेती-मातीला वेळ द्यायला तरुणाई तयार नाही, अशी खंत व्यक्त करून गुलाबराव पाटील म्हणाले, की केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाच्या मागे न लागता तरुणांनी शेतीशी नाते जोडून प्रगत शेतकरी व्हायला हवे. आपल्या देशात शेतीला महत्त्व दिले जात नाही, तोवर प्रगती होणार नाही. मी "ऍग्रोवन'चा नियमित वाचक आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा "सकाळ' तरुणांनाही प्रगत शेतीकडे वळवू शकेल, अशी खात्री वाटते. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शनासाठी "यिन'ने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com