बदलत्या राजकीय रंगात उपाध्यक्ष सरस 

बदलत्या राजकीय रंगात उपाध्यक्ष सरस 

जिल्हा परिषदेतील पोषण आहाराचा मुद्दा नवीन नाही. मुलांशी संबंधित असलेल्या या प्रकरणातही राजकीय रंग चढविण्यात आला. एकीकडे शालेय पोषण आहार प्रकरणात वर्षभरापासून आवाज उठविणाऱ्या सदस्यांच्या हाती काहीच आले नाही. पण, महिनाभरापूर्वी एका अंगणवाडीत आढळून आलेल्या बुरशीयुक्‍त शेवयांच्या प्रकरणात उपाध्यक्षांनी गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयात यश मिळविले. प्रशासनाकडून होणाऱ्या चुकांचे पितळ सर्वसाधारण सभेत उघड झाले ही निश्‍चित चांगली बाब. पण, जिल्हा परिषदेतील बदलणाऱ्या राजकीय रंगात अध्यक्षांचा आवाज दबला, तर उपाध्यक्षांनी सभा चालवत बाजी मारली आहे. 
..... 

मिनी मंत्रालयात राजकारण हा कळीचा मुद्दा ठरतो. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांचे वाद निश्‍चित पाहण्यास मिळतात. विद्यमान बॉडीत सत्ताधारी गटातीलच मतभेद वारंवार उफाळून येणे, ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. परंतु, आता जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता ज्यांच्या आधार घेऊन उभी आहे, त्यांचाच आवाज अध्यक्षांना शांत बसविण्यापर्यंत पोचला, हे चित्र अचंबित करणारे आहे. सर्वसाधारण सभेत इतिवृत्तातील अर्थसंकल्पाच्या विषयावर चर्चेदरम्यान अध्यक्षांनी बोलण्यास सुरवात करताच प्रभाकर सोनवणेंनी प्रथम माफी मागत अध्यक्षांनाच अज्ञानी म्हटले. असे विषय आता सभागृहासाठी नवीन राहिले नाहीत. परंतु, उपाध्यक्ष महाजन यांनी यानंतर उचललेला सिंचन आणि अंगणवाडीतील पोषण आहार यामध्ये अध्यक्षांचा विषयच दाबला गेला. 

वर्षभरापासून गाजत असलेल्या पोषण आहाराशीच निगडित अंगणवाडीमधील पोषण आहाराचा मुद्दा सभेत उपाध्यक्षांनी छेडला. लहान बालकांच्या दृष्टीने विषय महत्त्वाचा आहे. परंतु, अंगणवाडीतील बालकांप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा असल्याचा सोईस्कर विसर उपाध्यक्षांना पडला. महिनाभरापूर्वी अंगणवाडीतील शेवयांचे पाकीट बुरशीयुक्‍त असल्याचे आढळून आले. हा विषय उपाध्यक्ष महाजनांनी सभागृहात जोरदार लावून धरला. अगदी तडवींनी शासनास पाठविलेला अहवाल सभागृहात आणण्यापर्यंत त्यांनी छडा लावला. यात वर्षभरापासून शालेय पोषण आहाराचा विषय लावून धरणारे जयपाल बोदडे आणि पल्लवी सावकारे यांनीही आहाराच्या विषयात हात घातला आणि याबाबतही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु, उपाध्यक्ष महाजन यांनी बोदडे यांना शांत बसवत आपलाच पोषण आहार लावून धरला. यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओंनी दिल्यानंतर विषय थांबला. पण, उपाध्यक्षांनी आपली बाजीच यात सरस असल्याचे दाखवून दिले. 

नाइकांची कार्यमुक्‍ती 
लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक यांच्या कार्यप्रणालीवर प्रत्येक सभेत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते असते. कामाच्या उद्‌घाटनाला सदस्यांना न बोलविण्याची नाराजी दरवेळी उफाळून येते, ती गुरुवारच्या सभेतही आलीच. ही नाराजी थेट नाइकांना कार्यमुक्‍त करण्याच्या ठरावापर्यंत पोचली. यात उपाध्यक्ष महाजन आणि शिवसेनेचे सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मांडलेल्या विषयाला सर्वांनीच पाठिंबा दर्शविला आणि कार्यमुक्‍तीचा ठराव पारीत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com