औषधींअभावी "सिव्हिल'ची सेवा "व्हेंटिलेटर'वर! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

जळगाव : येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना या वैद्यकीय संकुलासाठी "सिव्हिल' वर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांपासून रुग्णालयातील अत्यावश्‍यक उपचारांवरील औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वैद्यकीय संकुल निर्माणाची प्रक्रिया सुरू असताना या गैरसोयीची जबाबदारी मात्र "सिव्हिल'चे प्रशासन घ्यायला तयार नाही. त्यामुळे "सिव्हिल'मधील आरोग्य व्यवस्थाच "व्हेंटिलेटर'वर असल्याचे चित्र आहे. 

जळगाव : येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना या वैद्यकीय संकुलासाठी "सिव्हिल' वर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांपासून रुग्णालयातील अत्यावश्‍यक उपचारांवरील औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वैद्यकीय संकुल निर्माणाची प्रक्रिया सुरू असताना या गैरसोयीची जबाबदारी मात्र "सिव्हिल'चे प्रशासन घ्यायला तयार नाही. त्यामुळे "सिव्हिल'मधील आरोग्य व्यवस्थाच "व्हेंटिलेटर'वर असल्याचे चित्र आहे. 

जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग, नवजात शिशू, प्रसूती कक्ष, जळीत कक्ष, आपत्कालीन विभागासारखे चोवीस तास रुग्णांची गर्दी असणारे विभाग कार्यरत आहेत. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आपत्कालीन (इमर्जन्सी) तसेच अन्य विभागात दररोज तीन ते चार हजार रुग्णांचा वावर या रुग्णालयात असून संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य सांभाळणारी यंत्रणा म्हणून "सिव्हिल'कडे पाहिले जाते. असे असताना गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नाही, तर अत्यावश्‍यक औषधींचा पत्ताच नसल्याचे सांगितले जात आहे. 

ऍन्टिबायोटिकऐवजी दुसरेच औषध 
कोणत्याही गंभीर आजारावर प्राथमिक उपचाराचे औषध म्हणून ऍन्टिबायोटिक वापरले जाते. मात्र, तेच उपलब्ध नसल्याने त्याऐवजी बी-कॉम्प्लेक्‍सचे पिवळे इंजेक्‍शन आणि सलाईन लावून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका जबाबदार अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लक्षात आणून दिला. औषधींचा तुटवडा रुग्णाच्या जिवावर बेतून रुग्ण दगावल्याची जबाबदारी टाळण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीर्घ रजा टाकल्याचेही बोलले जात आहे. 

या औषधींचा पत्ताच नाही..! 
नियमित तपासणीत गरीब रुग्णांना लिहून दिल्या जाणाऱ्या खोकल्याच्या औषधी, स्टेरॉईड प्रकारातील औषधी, जळीत रुग्णांसाठी आवश्‍यक सिल्वर सोप्रामायसिन, सिप्रो- टेट्रा सायक्‍लीन, टॅक्‍सीन, जेंटामायसीन यासारख्या आवश्‍यक गोळ्या, इंजेक्‍शनसह दुखापतीवर वेदनाशामक औषधीही पुरेशा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात वैद्यकीय संकुलाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. 
 
शवपेट्या झाल्या नादुरुस्त 
जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनगृहात सहा मृतदेह ठेवता येतील असे मोठे आधुनिक फ्रिजर आहे. मात्र, शवपेट्या नादुरुस्त झाल्याने, अपघातात छिन्न- विछीन्न मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत असल्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. शीतपेट्यांना वर्ष झाले असून त्याची देखभाल- दुरुस्ती शासनाच्या संबंधित ठेकेदाराकडेच आहे. वॉरंटी काळात पत्रव्यवहार करून मक्तेदारास कळविल्यानंतरही त्याने काम केलेले नाही. 
 

गेल्या ऑक्‍टोबर (2017)पासून रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्ग करण्यात आले असून तेव्हापासून औषधांसह अन्य सुविधांची जबाबदारी रुग्णालय प्रशासनावर आहे. 
- डॉ. नागुराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

Web Title: marathi news jalgaon jilha hospital medicine