खडसेंच्या संकेतास्त्राचा राजकीय वेध! 

residentional photo
residentional photo

जळगाव : "मुख्यमंत्र्यांनी रहस्यभेद केल्यास जळगावचे शंभर नगरसेवक तुरुंगात जातील...' असा गौप्यस्फोट करीत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ठेवणीतील एक "अस्त्र' विरोधकांवर सोडले. मात्र ते सोडत असताना आपल्याला कोणाशीही संघर्ष करायचा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा धमाका का केला, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजप-सेना युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. अर्थात, त्यास भाजप-शिवसेनेतूनही अंतर्गत विरोध आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी भाजपकडे "इनकमिंग'ची रांग मोठी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खडसेंनी या अस्त्रातून अनेक वेध घेतले आहेत, असे म्हणावेच लागेल... 

 
एकनाथ खडसे हे मुरब्बी नेते आहेत. त्यांना राजकीय हवामानाचा अंदाज लवकर येतो, असे त्यांचे विरोधकही म्हणतात. विरोधी पक्षात असताना त्यांनी त्यावेळच्या आघाडी सरकारला विधिमंडळ व बाहेरही अक्षरशः जेरीस आणले होते. विरोधक त्यांना घाबरत असले, तरी स्वकियांतून त्यांना दगाफटका झाला, ही गोष्ट वेगळी. मात्र, आजही राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा कायम आहे. त्यामुळे बुधवारी (ता. 23) त्यांनी जळगाव महापालिकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीबाबत केलेले वक्तव्य तेवढे सहज घेता येणार नाही. त्याबाबतचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिवाय, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचाच हवाला दिला आहे. त्यामुळे बाब गांभीर्याची आहे. तथापि, त्यांनी याबाबत आता आपल्याला संघर्ष करायची इच्छा नाही, सुरेशदादा जैनांशी आपले वैर नाही, असे मत व्यक्त करून राजकीय "गुगली'ही टाकली आहे. 
महापालिकेत सुरेशदादा जैन यांच्या गटाचे नेतृत्व असून, याआधी घरकुल गैरव्यवहार प्रकरणात या गटातील नेते, नगरसेवकांवरही कारवाई झालेली आहे. मात्र, कारवाईनंतरही जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीत फूट पडलेली नाही. शिवाय कोणताही नगरसेवक आघाडी सोडून गेला नाही. उलट गेल्या निवडणुकीत जैन नसतानाही त्यांच्या आघाडीकडे उमेदवारांची गर्दी होती. शिवाय इतर पक्षातील काही जणांनी आघाडीत प्रवेश केला होता, हे विसरून चालणार नाही. त्यावेळीही आघाडीला सर्वाधिक 32 जागा मिळाल्या आणि सत्ताही त्यांचीच आली. विरोधी भाजपला केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. पुढे विधानसभा निवडणुकीत स्वतः जैन यांचा पराभव झाला असला, तरी त्यावेळी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेक जण पडले होते. त्याचा काहीअंशी परिणाम जळगावातही दिसून आला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारवाई झाली तरी जैन यांच्या गटात फारशी फाटाफूट झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे खडसेंच्या नव्या संकेतास्त्रामुळे महापालिकेतील सत्ताधारी बिचकतील, असेही चित्र नाही. 

राजकीय डावपेचात वाकबगार असलेले खडसे हवेत वार करणार नाहीत, हेदेखील नक्की. त्यांनी सोडलेले हे अस्त्र अनेक लक्ष्यवेध करणार असल्याचे दिसत आहे. केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे, तर आगामी काळात अनेक राजकीय फेरबदल होण्याचे संकेत आहेत. जळगावात त्या दृष्टीने वाटचालही सुरू आहे. महापालिका निवडणुकीत भाजप आणि सेना युतीबाबत चर्चेचे पडघम वाजत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तार छेडतील आणि त्यातून "युती..युती' असा सुमंगल आवाज येईल, अशी खात्री जैन-महाजन या दोघांनाही नाही. तरीही त्यांच्याकडे हा प्रस्ताव नेला जात आहे. त्यासाठी ते वेळही देत नाहीत. मग या मागचे कोडे नक्की काय, हाच खरा प्रश्‍न आहे. 

एकीकडे मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षातील दिग्गजांचे भाजपमध्ये "इनकमिंग' करीत आहेत. मग जळगाव महापालिकेत "युती'ला ते सहमती कसे देतील? दुसरीकडे युतीचा प्रस्ताव घेऊन येणाऱ्या आपल्याच पक्षाचे शिलेदार गिरीश महाजन यांना त्यांनी शिवसेनेच्या विरोधात पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे. तिथे भाजप शिवसेनेची उणीदुणी काढत आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे माहीत नाही. परंतु, तो राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा असेल, एवढे मात्र निश्‍चित आहे. त्यानंतरही तेच महाजन जळगावात "युती करा' कसे म्हणतील, असाही प्रश्‍न आहे. त्यामुळे "युती' की थेट "संगम' करण्यासाठीच हा प्रयत्न आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे. श्री. जैन यांनीही एका भाषणात आपल्याला विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांनीही सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जैन यांनाही आगामी काळात संघर्ष नको आहे. म्हणूनच त्यांनी युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणूनच खडसे यांचे संकेतास्त्र आजच्या राजकीय संदर्भात महत्त्वाचे ठरणारे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com