कोल्हे कुटुंब प्रभाव कुठे आजमावणार? 

कोल्हे कुटुंब प्रभाव कुठे आजमावणार? 

सभागृहातील बारा सदस्यसंख्येवर महापौरपद मिळविणारे ललित कोल्हे महापालिका निवडणुकीत कोणतीही किमया साधू शकतात, असा त्यांचा लौकिक आहे; किंबहुना कोल्हे कुटुंबीयांचा प्रभाव असलेले काही "पॉकेट्‌स' शहरात पक्के आहेत. आता या प्रभाव असलेल्या कोणत्या भागांमध्ये कोल्हे कुटुंबीय आपले नशीब आजमावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तरीही स्वतः महापौरांसह त्यांच्या मातोश्री सिंधूताई प्रभाग 11 मधून तयारी करत असल्याचे सांगण्यात येत असून, वडील विजय कोल्हे यांचे जुने जळगाव पक्के असल्याचे मानले जात आहे. ललित कोल्हेंच्या भाजप प्रवेशानंतर तर सारं समीकरणच बदलून गेलंय, हा भाग वेगळा. 
 
2013 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ललित कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली आणि तब्बल 12 जागा जिंकून आणल्या. "मनसे'ची उमेदवारी असली, तरी कोल्हे कुटुंबीयांच्या प्रभावाने या जागा निवडून आल्याचे कोल्हे यांचे विरोधकही मान्य करतील. ललित कोल्हे यांनी त्यांचा प्रभाव दाखविण्यासाठी संख्येचा कधीही आधार घेतला नाही. सुरेशदादा जैन यांच्याशी निष्ठेचा दावा करीत त्यांनी 12 सदस्यांच्या बळावर जैन यांच्याकडून वर्षभरापूर्वी महापौरपद मिळवून घेतले. 
कोल्हे कुटुंबीय आधीपासूनच सुरेशदादा जैन यांचे निष्ठावंत म्हणून मानले जाते. मध्यंतरीच्या काळात त्यात वितुष्ट आले, ते बाजूला झाले. तरी तोडावी इतके संबंध कधीच ताणले गेले नाहीत आणि महापौरपद मिळाल्यानंतर तर ललित कोल्हे जैन यांचे भक्तच झाले. आता "मनसे'चे "इंजिन' सोडून ललित कोल्हे यांनी "7, शिवाजीनगर'चा रस्ता धरला होता. आणि आठवडाभरातच ते भाजपवासी झालेत. स्वतः ललित कोल्हे यांच्यासह विजय कोल्हे, सिंधूताई कोल्हे हे एकाच कुटुंबातील तीन उमेदवार असू शकतात. कोल्हे निवडून आणतील असे आणखी आठ- दहा जण तरी पक्के आहेत. शिवाय, त्यांच्या काकांच्या कुटुंबातील आशा कोल्हे, परेश कोल्हे हेही उमेदवारी करू शकतील. 

कोल्हे कुटुंबाचा प्रभाव जुन्या जळगावसह शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, कोल्हेनगर, भूषण कॉलनी, मू. जे. महाविद्यालयामागील भाग, रामानंदनगर, यशवंतनगर, शास्त्रीनगर, हरिविठ्ठलनगरसह या संपूर्ण परिसरात जाणवतो. या प्रभावाच्या जोरावर ललित कोल्हे कुणालाही उमेदवारी देऊन निवडून आणू शकतात, एवढी त्यांची क्षमता. स्वतः ललित यांच्यासह त्यांच्या मातोश्रींनी प्रभाग 11 मधून तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रभागातून राम पवार यांच्या कुटुंबातील सदस्यही इच्छुक आहेत. कोल्हेंसह कुटुंबीय व त्यांचे नगरसेवक भाजपवासी झाल्याने आता शिवसेना किंवा खानदेश विकास आघाडीला वेगळे डावपेच रचावे लागतील. त्यामुळे या कंनपीविरोधात उमेदवार कोणते द्यायचे, हा प्रश्‍न जैन गटासमोर राहील. 
विजय कोल्हे गेल्या वेळेप्रमाणे जुन्या जळगावातून म्हणजे सध्याच्या प्रभाग 4 मधून लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्या उमेदवारीची पंचाईत होऊ शकते. ते मूळ भाजपवाले असल्याने त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल. अन्यथा, या प्रभागातून आणखी कोण वेगळे उमेदवार पुढे येतील, हे बघावे लागेल. कोल्हेंच्या भाजप प्रवेशाने अनेक समीकरणे बदलून गेलीत, हे मात्र निश्‍चित. आणि या समीकरणांचा प्रभाव प्रभाग 3, 4 व 10, 11 मध्ये बघायला मिळू शकेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com