अंथरुणाला खिळलेला पीडित न्यायासाठी न्यायालयात 

अंथरुणाला खिळलेला पीडित न्यायासाठी न्यायालयात 

जळगाव : ब्रेन हॅंब्रेजने मृत्युमुखी पडलेल्या शालकाला रुग्णवाहिकेत घरी घेऊन जाताना भुसावळ ते पाडळसेदरम्यान ट्रक व रुग्णवाहिकेची धडक होऊन रुग्णवाहिका घरंगळत जाऊन महामार्गावरून खाली कोसळली. या अपघातात मृतदेहासोबत असणारे सर्वच जखमी होऊन त्यातील शरद विठ्ठल इंगळे गंभीर जखमी झाले होते. गेली दोन वर्षे पलंगाला खिळून असलेल्या या रुग्णाला आज तशाच अवस्थेत जिल्हा न्यायालयात आणण्यात आले. अपघात दाव्यात न्यायालयाने रुग्णाची पाहणी करून तडजोडीअंती साडेसात लाख तत्काळ अदा करण्याचे आदेशित केले आहे. 

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणातर्फे आज महालोक अदालतीचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील भूसंपादन, ग्राहकसेवा, अपघाती प्रकरणे विविध पॅनलसमोर ठेवण्यात येऊन त्यात दोन्ही पक्षांच्या वकील पक्षकारांसमक्ष सामोपचाराने तडजोड करण्यात आली. मस्कावद (ता. सावदा) येथील रहिवासी शरद विठ्ठल इंगळे (वय 42) यांच्या पत्नीचा चुलतभाऊ विलास खाचणे याचा ब्रेन हॅंब्रेजने मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह घेऊन शरद इंगळे भुसावळहून मूळ गावाकडे निघाले असताना, 20 जानेवारी 2017 ला भुसावळ- पाडळसेदरम्यान ट्रकने त्यांच्या रुग्णवाहिकेला समोरून धडक दिली. अपघातात रुग्णवाहिका महामार्गाच्या बाजूला घरंगळत जाऊन कोसळली होती. या अपघातात शरद इंगळे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटना घडल्यापासून शरद इंगळे 3 ते 4 महिने कोमात गेलेले होते. शुद्ध आल्यानंतरही आजतागायत ते अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत असून, त्यांच्या उपचारावर प्रचंड खर्च करावा लागत आहे. अपघातास कारणीभूत ट्रकचालकाविरुद्ध दाखल गुन्ह्यात ट्रकच्या विमा कंपनीवर नुकसानभरपाईचा दावा करण्यात आला होता. मात्र, "तारीख- पे- तारीख'मुळे खर्च मिळण्यात व्यत्यय येत असल्याने अखेर प्रकरण महालोक अदालतीत आले. 

एका दिवसात प्रकरणाचा निपटारा 
अपघात घडल्यापासून शरद इंगळे अंथरुणावर असून, सासरे गोपाळ पाटील यांच्याकडे रतलाम (मध्य प्रदेश) येथे महागडे उपचारही सुरू आहेत. महालोक अदालतीत खटल्याचे कामकाज असल्याने त्यांना खासगी रुग्णवाहिकेने जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. खटल्याचे कामकाज महालोक अदालतीच्या पॅनलसमोर आल्यावर, न्या. चित्रा हंकारे, ऍड. अमोल चौगुले, ऍड. महेंद्र चौधरी यांच्यासह पॅनलच्या सदस्यांनी अंथरुणावर खिळलेल्या इंगळेची प्रत्यक्ष पाहणी करून, औषधोपचार आणि अपघातात आलेल्या अपंगत्वाची माहिती घेतल्यावर कामकाजाला सुरवात झाली. न्यायालयीन पॅनलसमोर 12 लाखांच्या अपघाती दाव्यावर तडजोड होऊन साडेसात लाख रुपये तत्काळ महिनाभरात कंपनीने अदा करण्याचा निर्णय झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com