उमेदवारीसाठी खासदारांचीच परीक्षा 

उमेदवारीसाठी खासदारांचीच परीक्षा 

खानदेशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षातर्फे लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. सर्वच खासदारांना पक्षाने आपापल्या मतदारसंघात तयारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सर्वच खासदार कामालाही लागले आहेत. बुथनिहाय मेळावे ते मतदार पन्नाप्रमुखापर्यंत बैठका घेऊन अहवाल सादर करण्याचे त्यांना आदेश आहेत. त्यानंतरच त्यांची उमेदवारीही निश्‍चित होणार आहेत. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने आता खासदारांचीच परीक्षा आहे..! 

खानदेश हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. नंदुरबार मतदारसंघ त्यातही अधिक महत्त्वाचा. देशभरात यात मतदार संघातून कॉंग्रेसच्या प्रचारास प्रारंभ होत असे. मात्र, गेल्यावेळेस या मतदारसंघात भाजपने यश मिळवीत बालेकिल्ल्याच्या अखेरचा बुरूजही ढासळून टाकला. त्यामुळे आता सर्व राजकीय गणितच बदलले. खानदेशच्या पट्ट्यात आता "कमळ' चांगलेच फुलले आहे. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत पक्षाला खानदेशातून पुन्हा चांगले यश मिळण्याची खात्री आहे. मात्र, लोकसभेतील विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल, याची मात्र पक्षातर्फे हमी देण्यात आलेली नाही. परिणामी उमेदवारी मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने खासदारांची परीक्षा आहे. 

धुळ्यातील धुसफूस 
धुळे लोकसभा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतला आहे. गेल्यावेळी विद्यमान खासदार प्रतापदादा सोनवणे यांना यांचे तिकीट कापण्यात आले आणि डॉ. सुभाष भामरे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. ते भरघोस मतांनी विजयी झाले अन्‌ त्यांना केंद्रात संरक्षण राज्यमंत्री हे महत्त्वाचे खाते मिळाले. मितभाषी असलेल्या डॉ. भामरे यांनी आपल्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात विकासाचे प्रयत्न केले आहेत. त्यांनी मनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाला चालना दिलेली आहे. या शिवाय इतरही कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणे निश्‍चित मानले जात आहे. तरी धुळे जिल्ह्यात भाजपतही अंतर्गत धुसफूस मोठी आहे. पक्षाने धुळे महापालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना नेतृत्व दिले आहे. मात्र, भाजपचेच आमदार अनिल गोटे यांनी ते नाकारत महाजन यांना उघड आव्हान दिले आहे. दुसरीकडे मंत्री भामरे यांनी महाजन यांची जळगावात भेट घेऊन पक्षाच्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे. यातच भामरे यांना धुळे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत बैठका, तसेच बुथनिहाय बैठका घ्यावयाच्या आहेत. त्यामुळे अंतर्गत खदखद असताना या बैठकांना मिळणारा प्रतिसाद तसेच आगामी महापालिका निवडणुकीतील यशावरही भामरे यांची लोकसभेची उमेदवारी अवलंबून असणार आहे. 

लकी नंदुरबार 
नंदुरबार मतदारसंघात भाजप विजयी होईल, तेव्हा या देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले असेल असे भाजपच्या गोटात म्हटले जात होते. गेल्या निवडणुकीत झालेही तसेच. गेल्यावेळी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती विभागाच्या पदाधिकारी डॉ. हीना गावित यांना भाजपमध्ये घेत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी नऊ वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या कॉंग्रेसच्या माणिकराव गावित यांचा पराभव केला. देशभरात त्या "जायंट किलर' ठरल्या. भाजपनेही देशभरात स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली, नंदुरबार मतदारसंघ लकी ठरला. भाजपने डॉ. हीना गावितांच्या माध्यमातून आदिवासी पट्ट्यात वर्चस्व निर्माण केले आहे. त्यात डॉ. विजय गावितांचाही वाटा मोठा आहे. त्यांच्यामुळे भाजपला येथे शिरकाव करता आला, हे पक्षही विसरलेला नाही. याशिवाय खासदार म्हणून हीना गावित यांची लोकसभेतील कामगिरी सरस आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात त्यांना 91 टक्के गुण आहेत. या कामगिरीवर हीना गावित यांना भाजपचे पुन्हा कमळ मिळणार हे निश्‍चित आहे. परंतु उमेदवारी जाहीर होईपर्यंत या मतदारसंघात राजकीय घडामोडी काय घडतात? यावरच त्यांची उमेदवारीही अवलंबून आहे. 

भाजपचा हक्काचा गड 
रावेर मतदारसंघ हा आता भाजपचा हक्काचा मतदारसंघ झालेला आहे. गेल्यावेळी तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा श्रीमती रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याही भरघोस मतांनी विजयी झाल्या. खडसे यांचा जिल्ह्यातील नेतृत्वाचा वाटा मोठा होता. आता खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर रक्षा खडसे यांनी आपल्या मतदारसंघात जनसंपर्क कायम ठेवत विकासही केला आहे. लोकसभेच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात त्यांची 79 टक्के कामगिरी आहे. त्यामुळे पक्षातर्फे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. त्यासुद्धा लोकसभेच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांनी बूथ प्रमुखांच्या बैठकाही घेतल्या आहेत. विशेष म्हणजे श्री. खडसे हे सुद्धा या बैठकांना उपस्थित आहेत. परंतु खडसेंच्या पक्षांतर्गत वादाचा परिणाम श्रीमती खडसे यांच्या उमेदवारीही होणार काय, असाही प्रश्‍न आहे. पक्षातर्फे काही नावेही पुढे येऊ लागली आहेत. 
त्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत त्यांच्याही उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे? 

जळगावात अग्निपरीक्षा 
जळगाव मतदारसंघात भाजपचे खासदार ए. टी. पाटील यांची हॅटट्रिक होणार काय, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. खासदार पाटील याच मतदारसंघात भाजपतर्फे दोन वेळा निवडून आले आहेत. मतदारसंघात विकासकामे केल्याचाही त्यांचा दावा आहे. तसेच लोकसभा कामगिरीच्या अहवालात त्यांना 89 टक्के गुण आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनीही उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या पाटलांच्या उमेदवारीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाने मतदारसंघात बैठका घेण्याचे आदेश दिल्यामुळे पाटील यांनी बूथ लेव्हलच्या बैठका सुरू केल्या आहेत. परंतु उमेदवारी जाहीर होईपर्यंत त्यांना परीक्षाच नव्हे, तर अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com