भूसंपादन मोबदल्याच्या प्रतीक्षेत महिलेने सोडले प्राण 

residentional photo
residentional photo

जळगाव : पिंप्राळा शिवारातील आरक्षित व भूसंपादनाचा निवाडा घोषित होऊन चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही संपादित जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्त महिलेस मिळाला नाही. अखेर गेल्या महिन्यात कर्करोगाने पीडित होऊन पैशाअभावी योग्य उपचार न मिळाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. आता त्या महिलेचा मुलगा न्यायासाठी संघर्ष करत आहे. यातील गंभीर बाब म्हणजे या विषयासंबंधी बनावट ठराव करून प्रकरण जाणीवपूर्वक अडकवून ठेवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. 
दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन महापौरांसह नगररचना विभागाचे अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांवर फसवणुकीचा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदाराने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. पोलिस अधीक्षकांनी या तक्रारीची दखल घेत प्रकरण शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांकडे चौकशीसाठी पाठविल्याचे समजते. 

काय आहे प्रकरण? 
महापालिका हद्दीत पिंप्राळ्यातील गट क्रमांक 115/4 या विद्या शैलेंद्र बियाणी यांच्या मालकीची जमीन शहराच्या विकास योजनेत आरक्षण क्रमांक 112 अन्वये बगिच्यासाठी आरक्षित करण्यात आली. शासनाने कलम 49 अन्वये या जमिनीची खरेदी सूचना 3 सप्टेंबर 2007 ला कायम केली. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेत (5128/11) महापालिकेकडून नगररचना विभागाच्या तत्कालीन सहाय्यक संचालकांनी जमीन संपादनाची हमी दिली होती. त्यानुसार खंडपीठाने 20 फेब्रुवारी 2014 ला नवीन कायद्यानुसार संपादन प्रक्रिया करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार या जागेच्या भूसंपादन प्रस्तावात (क्रमांक 6/07) तत्कालीन उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी अंतिम निवाडा घोषित केला, या निवाड्याला महापालिकेने न्यायालयात आव्हानही दिलेले नाही. 

रक्कम देण्यास टाळाटाळ 
दरम्यान, जमिनीचे सहमालक अतुल मुंदडा यांनी नगररचना सहाय्यक संचालकांची भेट घेतल्यानंतर संपादनासाठी निधी शिल्लक असल्याने जागामालकांनी ठराविक रक्कम जमा करण्याचे सांगितले. यासंदर्भात महापालिकेचे विधी सल्लागार ऍड. केतन ढाके यांचा अभिप्रायही घेण्यात आला, त्यांनी निवाडा रद्द होऊ शकत नाही, मात्र निवाड्यात दुरुस्तीची महापालिकेची विनंती सुचविल्याचे मत नोंदविले. भूसंपादन अधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावल्यानंतर संपादनाच्या मोबदल्याची रक्कम अदा करणे गरजेचे होते, मात्र तेव्हापासून आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. 

 न्यायाच्या प्रतीक्षेत मृत्यू 
दरम्यान, या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, तसेच तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी बिल अदा करण्यासंबंधी सूचना दिल्यानंतरही जमीन मालकांना मोबदला मिळालेला नाही. उलटपक्षी या प्रस्तावासंबंधीचे बिल गहाळ झाले, बनावट ठरावाद्वारे हे प्रकरण रखडविण्यात आले. अखेरीस जागामालक विद्या बियाणी यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यांच्या उपचारासाठी पैसा हवा म्हणून या मोबदल्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी विद्या बियाणी यांचा गेल्या महिन्यात दुर्दैवी मृत्यू झाला. 

 
यांच्याविरुद्ध गुन्ह्याची मागणी 
या एकूणच प्रकरणात जमीन संपादनाचा मोबदला कोणतीही न्यायालयीन बाब, अडथळा, स्थगिती आदेश नसताना केवळ दृष्ट हेतूने देण्यात आलेला नाही. त्यातूनच जमीनमालक महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिस अधीक्षकांकडील तक्रारीद्वारे करण्यात आला आहे. या तक्रारीत महापालिकेचे तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम, कार्यरत संचालक के. पी. बागूल, निवृत्त सहाय्यक संचालक सदानंद फडणीस, सहाय्यक नगररचनाकार भास्कर भोळे, तत्कालीन रचना सहाय्यक समीर बोरोले, कार्यरत रचना सहाय्यक भागवत पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, कार्यरत नगरसचिव, उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्याविरुद्ध फसवणुकीसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
 
(बिलच गहाळ केले.... वाचा उद्या) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com