सहा वर्षांत घटला माता मृत्यूदर..! 

सहा वर्षांत घटला माता मृत्यूदर..! 

जळगाव ः आहाराची कमतरता आणि गरोदरपणी व्यवस्थित काळजी न घेतल्याने मातामृत्यू किंवा बालमृत्यू होण्याची शक्‍यता अधिक असते. ते रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या वेगवेगळे उपक्रमाने बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील बालमृत्यूचा दर 11, तर मातामृत्यू दर 31 पर्यंत खाली आला आहे. गेल्या सहा वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. 

साधारण पंधरा- वीस वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यास महिलांची प्रसूती रुग्णालयाऐवजी घरीच दायीच्या मदतीने केली जात होती. त्यामुळे प्रसूतीदरम्यान महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. शिवाय, गरोदर महिलांची नियमित तपासणी किंवा आरोग्याची निगा राखली जात नसल्याचे कारण देखील यामागे होते. मात्र, शासनाच्या जननी सुरक्षा योजनेमुळे प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात येऊ लागल्याने मातामृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाली आहे. हे आशादायक चित्र गेल्या पाच- सहा वर्षांपासून जिल्ह्यात निर्माण झाले आहे. तरीही अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

दीड वर्षात 26 मातांचा मृत्यू 
मातामृत्यू कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे गेल्या काही वर्षांत माता मृत्यूचे प्रमाण घटले असले, तरी जिल्ह्यात 2015-16 मध्ये 33 मातांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण गेल्या वर्षात 20 वर होते. मुळात भारतातील मातामृत्यूचा दर 130, तर राज्याचा दर 61 आहे. जळगाव जिल्ह्यातील माता मृत्यूदर 58 वरून 31 वर आला आहे. ही बाब चांगली असली, तरी गेल्या दीड वर्षात 26 मातांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

बालमृत्यूही घटला 
जिल्ह्यातील बालमृत्यूचा साधारण आठ वर्षांपूर्वीचा विचार केल्यास हे प्रमाण दीड हजाराच्या वर होते. म्हणजेच 2011- 12 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण 1 हजार 539 होते. हे प्रमाण दरवर्षी कमी होऊन ते 2017-18 मध्ये ते निम्म्यावर अर्थात 556 वर आल्याचे आशादायक चित्र आहे. राज्यातील बालमृत्यूच्या तुलनेत जिल्ह्यातील बालमृत्यूचा रेशोचा विचार केल्यास यात आठची तफावत आहे. राज्यातील बालमृत्यूचा रेशो 20 असून, जिल्ह्यातील प्रमाण 11 इतके आहे. 
 
तीन वर्षांतील मातामृत्यू 

2015-16......33 
2016-17......36 
2017-18......20 
जून 2018 पर्यंत...6 
 
बालमृत्यूची संख्या 
2011-12......1,539 
2012-13......1,236 
2013-14.......883 
2014-15.......779 
2015-16.......589 
2016-17.......609 
2017-18.......556 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com