मूकबधिराची जळगावात लूट 

मूकबधिराची जळगावात लूट 

जळगाव : शहरातील व. वा. वाचनालयाच्या गल्लीतून पायी जात असताना एका इसमाचा मोबाईल व खिशातील हजार रुपये चोरट्याने बळजबरीने हिसकावून नेले होते. घडला प्रकार केवळ हातवाऱ्यांनी सांगत असल्याने तो पोलिसांनाही कळत नव्हता. अखेर मूकबधिर शाळेच्या शिक्षकांना पाचारण करून शहर पोलिसांनी निःशब्द फिर्यादीची तक्रार नोंदवून घेतली. 
सामान्य माणूस कुठल्याही परिस्थितीत पोलिस ठाण्यात येण्यास तयार नसतो, त्याच्यावर खरोखर अन्याय झाला तर तो पोलिसांची पायरी चढतो. पोलिस ठाण्यात गेल्यावर त्याची तक्रार नोंदवूनच घेतली जाईल, याचीही शाश्‍वती नसते. बऱ्याच वेळा तक्रारदार जीव तोडून आपल्यावर झालेला अन्याय सांगत असतो. मात्र त्यातही जातिवंत पोलिस तक्रार खरी की, खोटी अशी शंका घेतो. मात्र, तक्रारदार खरा आहे व त्याच्यावर अन्याय झालेलाच आहे हे सांगण्यासाठी आरडाओरड, गोंधळ आणि कुठलाही राजकीय वशील्याची आवश्‍यकता नसते, हे शहर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार उल्हास चऱ्हाटे यांनी निःशब्द (मूकबधिर) तक्रारदाराची तक्रार नोंदविण्यासाठी खास हातवारे समजून घेण्यासाठी मूकबधिर शाळेचे विशेष शिक्षक हेमंत किशोर मुंदडा यांना पाचारण करून घेत, तक्रारदाराचे म्हणणे संशयिताचे वर्णनासह असा संपूर्ण घटनाक्रम तासभर पोलिस तक्रार म्हणून नोंदवीत होते. 

रस्तालुटीचा गुन्हा दाखल 
पारोळा येथील रहिवासी सुरेश बाजीराव पाटील (वय 45) हे सोमवारी (26 मार्च) जळगावात आले होते. फुलेमार्केटमधून फेरफटका मारल्यावर रेल्वेस्थानकाकडे जाताना रात्री साडेदहाच्या सुमारास व. वा. वाचनालयाच्या गल्लीत एका भामट्याने त्यांना अडवले. सुरेश पाटील मूकबधिर असल्याने त्यांना मदतीसाठी आरोळ्या मारणेही अशक्‍य होते. परिणामी, या भामट्याने त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा 16 हजार रुपयांचा मोबाईल व हजार रुपये रोख बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली. तक्रार देण्यासाठी ते शहर पोलिस ठाण्यात आले, मात्र काही केल्या त्यांचे म्हणणे समजत नसल्याने अखेर पोलिसांनी मूकबधिर शाळेच्या शिक्षकांना पाचारण करून अखेर लूटमार प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com