पंचवीस कोटींच्या प्रस्तावित कामांना पुन्हा "ब्रेक'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यापासून "ग्रहण' लागलेल्या 25 कोटी निधीच्या विनियोगातील गतिरोधक कमी व्हायला तयार नाहीत. या निधीतून काही कामे प्रस्तावित होऊन ते मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने या कामांना "ब्रेक' लागला आहे. त्यातच आता पावसाळा तोंडावर असल्याने प्रक्रिया होऊनही नवीन कामे हाती घेता येणार नसल्याने ही कामे चार महिने लांबणार असल्याचे बोलले जात आहे. 

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यापासून "ग्रहण' लागलेल्या 25 कोटी निधीच्या विनियोगातील गतिरोधक कमी व्हायला तयार नाहीत. या निधीतून काही कामे प्रस्तावित होऊन ते मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने या कामांना "ब्रेक' लागला आहे. त्यातच आता पावसाळा तोंडावर असल्याने प्रक्रिया होऊनही नवीन कामे हाती घेता येणार नसल्याने ही कामे चार महिने लांबणार असल्याचे बोलले जात आहे. 

जळगाव महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी (जून 2015मध्ये) विविध विकासकामांसाठी 25 कोटींचा निधी जाहीर केला होता. त्याचा योग्य विनियोग केल्यास आणखी 50 कोटी रुपये मनपास मिळणार होते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने तीन वर्षांतही या निधीचा विनियोग झालेला नसून काही ना काही कारणामुळे त्यातील प्रस्तावित कामांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. 
 
अशी कामे होती प्रस्तावित 
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 25 कोटीतून 17 कोटी रुपयांच्या गटारी व पुलांची कामे मंजूर. त्यांचे शेड्यूल बी सुरू असून निविदा प्रक्रिया सुरू होण्यास अद्याप 3 दिवस लागणार आहेत. उर्वरित 7 कोटींत एलईडीची कामे रद्द करून त्यातून 6 लिफ्ट, स्मशानभूमीत गॅसवाहिनी व नाल्यांच्या संरक्षक भिंती. 
 
अन्य कामेही लांबणार 
सागरपार्कच्या सुशोभीकरणासाठी 59 लाख रुपयांचा प्रस्ताव होता. हे काम चुकून 25 कोटींच्या निधीत गेल्याने ते रद्द करून नव्याने प्रस्ताव करावा लागणार आहे. मेहरुण तलावाच्या पेरीफेरीसाठी साडेतीन कोटीचा प्रस्ताव असून त्याची निविदा प्रक्रिया बाकी आहे. यासह नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेतील 2 कोटी 75 लाख रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजूर असून त्यांनी देखिल निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासनाकडून महापालिकेस मूलभूत सुविधांसाठीच्या 5 कोटींच्या निधीतील कामांचे प्रस्ताव तयार करून त्यांना महासभेची, विभागीय आयुक्तांची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यासह पर्यटन विभागाकडून मेहरुण तलावासाठी मंजूर करण्यात आलेल्या 4 कोटी 95 लाखांच्या निधीबाबत अद्याप प्रशासनाकडे पत्र न आल्याने प्रस्ताव तयार करणे बाकी आहे. 
 
हे आहेत अडथळे 
- शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू 
- पावसाळ्यात नवीन कामांना मर्यादा 
- मनपा निवडणुकीची संभाव्य आचारसंहिता 
 

25 कोटींतील 17 कोटींच्या कामांना मंजुरी व प्रस्तावित कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदाही प्राप्त असून निविदा मंजुरी व कार्यादेश देऊन कामे तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. निधी व कामे आधीच मंजूर असल्याने आचारसंहितेची अडचण त्यात राहणार नाही. 
- ललित कोल्हे, महापौर. 
 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation