पंचवीस कोटींच्या निधीतील कामांचे भवितव्य अंधारात! 

पंचवीस कोटींच्या निधीतील कामांचे भवितव्य अंधारात! 

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 25 कोटींच्या निधीतील कामे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या श्रेयवादात रखडल्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी जारी झालेल्या आचारसंहितेमुळे या कामांना पुन्हा "ब्रेक' लागला आहे. किंबहुना निवडणुकीनंतर पालिकेत कुणाची सत्ता येते, त्यावर या निधीच्या विनियोगाचे भवितव्य अवलंबून असेल. तर दुसरीकडे नव्याने साकारलेल्या बंदिस्त नाट्यगृहाच्या उद्‌घाटनाची प्रतीक्षाही या आचारसंहितेमुळे लांबणार आहे. 
जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आणि राजकीय पक्ष-आघाड्यांसह प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली. सप्टेंबरमध्ये मुदत संपलेल्या महापालिका सभागृहातील सदस्यांसाठी साधारण जुलैत निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन ऑगस्ट शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात महिनाभर आधीच निवडणुका होत असून त्याचा कार्यक्रमही आज जाहीर होऊन आचारसंहिता जारी झाल्याने विकासकामांना "ब्रेक' लागणार आहे. 

25 कोटींची कामे रखडली 
कर्जबाजारी व आर्थिक कोंडीत सापडलेल्या जळगाव महापालिकेत विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी जून 2015 मध्ये 25 कोटींचा निधी जाहीर केला होता. या निधीचा योग्य विनियोग केल्यास आणखी 50 कोटी देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. दुर्दैवाने राजकीय हस्तक्षेपामुळे या 25 कोटींच्या निधीचे कामांच्या दृष्टीने नियोजन झालेच नाही. महापालिकेतील सत्ताधारी गट व भाजपचे स्थानिक आमदार तसेच नगरसेवकांमधील वादात या निधीतील कामे तीन वर्षांपासून रखडली आहेत. कामे कोणती घ्यायची, कोणत्या वॉर्डात घ्यायची यापासून ती कुणी करायची इथपर्यंत वाद होऊन या निधीचा विनियोग आजपर्यंत होऊ शकलेला नाही. 

आचारसंहितेने ब्रेक 
गेल्या महिन्यात 25 कोटींच्या निधीतून करावयाच्या कामांचे नियोजन झाले, त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. त्यातच आता निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी झाल्यानंतर या प्रक्रियेला "ब्रेक' लागला आहे. आजपासून लागू झालेली आचारसंहिता थेट तीन ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यानंतर 22 सप्टेंबरला नव्या महापौरांची निवड होईल आणि नवीन सभागृह, नवे ठराव करून नवीन कामे ठरवतील. त्यानुसार या निधीचे नियोजन पुन्हा बदलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एकूणच या निधीतील कामांचे भवितव्य अंधारात आहे. 
 
"अमृत'च्या कामांना अडचण नाही 
आचारसंहितेचा फटका 25 कोटींच्या निधीतील कामांसह जी कामे मंजूर होऊन कार्यादेश दिलेले नाहीत, त्यांनाही बसणार आहे. मात्र, याआधीच मंजूर व कार्यादेश दिलेल्या "अमृत' योजनेतील पाणीपुरवठा योजनेच्या कामांना आचारसंहितेचा कुठलाही अडसर नसेल. 
 
गाळेप्रश्‍नही रखडणार 
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गाळे करार नूतनीकरणाच्या प्रक्रियेलाही आचारसंहितेची अडचण येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मालमत्ता भाडेपट्टा अधिनियमात बदल करण्यासंबंधी नुकताच निर्णय घेतला असून, त्यानुसार महापालिकेअंतर्गत गाळे करार नूतनीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळणार होती. आता सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात जुंपली जाईल, त्यामुळे या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होऊन महापालिकेच्या प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या गाळे करार नूतनीकरण व लिलाव प्रक्रियेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. 

नाट्यगृहाचे लोकार्पण लांबणीवर 
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या बंदिस्त नाट्यगृहाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच पूर्णत्वास नेले. मात्र, 32 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या नाट्यगृहाचे उद्‌घाटन या ना त्या कारणाने दोन महिन्यांपासून रखडले आहे. सुरवातीला मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने, नंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते ठरल्यानंतर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने नाट्यगृहाचे लोकार्पण लांबले. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊन आचारसंहिता 2 जुलैस शिथिल होणार होती, त्यानुसार 3 जुलैस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते नाट्यगृहाचे उद्‌घाटन करण्याचे नियोजित होते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेने नाट्यगृहाचे उद्‌घाटन पुन्हा लांबणीवर पडले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com