जिल्ह्यात कोअर पोलिसींगवर भर : दत्तात्रय शिंदे 

जिल्ह्यात कोअर पोलिसींगवर भर : दत्तात्रय शिंदे 

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर बदली झाली असून त्याच्या जागी नागपूर येथून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. आज संध्याकाळी श्री. शिंदे यांनी पदभार स्वीकारला. जिल्ह्यातील एकूणच गुन्हेगारीचा अभ्यास करून आगामी काळात सहकारी अधिकाऱ्यांसह कोअर पोलिसींगवर अधिक भर राहील. सदरक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद प्रमाणे गुन्हेगारांवर वचक व सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

नवनियुक्त पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मूळ चिंचोली. पोस्ट पांढरी (ता. बार्शी, सोलापूर) येथील असून एम.एस्सी.(ऍग्रिकल्चर), जीडीसी ऍड. ए,एल.एल. बी पर्यंत शिक्षण झाले आहे. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नाशिक पोलिस ऍकॅडमी येथील प्रशिक्षण घेतल्यावर 2 डिसेंबर 1996 मध्ये पोलिसदलात रुजू झाले. त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली, गोंदिया या दोन जिल्ह्यात प्रभावीपणे नक्‍शल विरोधी अभियाने राबविल्याने राज्य सरकारने त्यांचा विशेष सेवा पदक देवून गौरव केला असून केंद्र सरकारने त्यांना आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्यकाळात एकही नक्‍शली कारवाई झाल्याची नोंद नसून अभियानांतर्गत दरेकसा, नक्षलदमच्या मल्लेश या नक्‍शलवाद्यास अटक करून उपकमांडर विक्रमच्या शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. तद्‌नंतर सोलापूर येथे जिल्ह्यात सहाय्यक पोलिस आयुक्त (भाग-2), सोलापूर सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा, सोलापूर दंगली प्रसंगी त्यांची प्रभावी कारवाई राहिली. नवी मुंबईत सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई क्राईम ब्रांच, पोलिस अधीक्षक फोर्स-वन, पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग, पोलिस उपअधीक्षक सांगली यानंतर राज्यराखीव पोलिस दल, नागपूर येथे समादेशक अशा विविध ठिकाणावर त्यांना कामाचा अनुभव असून राजकीय संवेदनशील असलेल्या जळगाव जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यावर कोअर पोलिसींगवर भर देणार असल्याचे सांगितले. कायद्याचे पालन करणाऱ्यांना निर्भयतेचे वातावरण आणि कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या दृष्टीने प्रभावी कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात झिरो टॉलरन्स निर्माण करून कायद्याचे राज्य कायम करण्याचे काम आपल्याकडून होणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
सामाजिक कार्यातही सक्रिय 
सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना 12 अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई, चार मोठ्या टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई, 192 मटका व्यावसायिकांना तडीपार करून वचक बसवला होता. सण-उत्सवात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डॉल्बी मुक्तीतून जलयुक्तकडे असे अभियान राबवून लोकवर्गणीतून सुखकर्ता, विघ्नहर्ता या बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. महिला सुरक्षा अभियानांतर्गत निर्भया सायकर रॅलीद्वारे महिला मुलींच्या गुन्ह्यात प्रभावी कारवाई आणि प्रबोध उपक्रम राबवण्यात आला. 

अप्पर अधीक्षक मतानी आज घेणार पदभार 
अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा पदभार लोहित मतानी उद्या (ता. 5) स्वीकारणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर तर अप्पर अधीक्षक बच्चन सिंग, नीलोत्पल दास यांची नियमित सर्वसाधार बदली झाली असून तिघा अधिकाऱ्यांना उद्या पोलिस मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com