रात्रपाळी करून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू

Lailesh Chaudhary
Lailesh Chaudhary

जळगाव - जळगाव - औरंगाबाद महामार्गावरील रॉयल फर्निचरजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन औद्योगिक वसाहतीमधून रात्रीपाळीची ड्यूटी करून घरी परतणाऱ्या लैलेश अविनाश चौधरी (वय २०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, घटनेतील दुसऱ्या दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी असून, एक जिल्हा रुग्णालयात तर दोन तरुण खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. 

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुना खेडी रोड येथील शंकररावनगरातील लैलेश अविनाश चौधरी (वय २०) हा आई-वडिलांसह वास्तव्यास होता. तो मू. जे. महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होता. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने लैलेश दिवसा महाविद्यालयात शिक्षण घेऊन रात्री औद्योगिक वसाहतीमधील एका वृत्तपत्राच्या वितरण विभागात कामाला जात होता. नेहमीप्रमाणे लैलेश ड्यूटी करून सकाळी चारला कंपनीतून दुचाकीने (क्र. एमएच १९, बीएच १८०४) घराकडे निघाला. तर कुसुंबा येथील पंकज जाधव (वय २०) हा त्याचा मित्र राहुल वाघ (वय २०) याला सोबत घेऊन दुचाकीने (एमएच १९, बीएफ ६६७०) सकाळी चारला जळगाव रेल्वेस्थानक येथे मामाला आणण्यासाठी गेले होते. पंकजने फत्तेपूरवरून आलेला त्याचा मामा विक्की साबळे (वय २२) याला दुचाकीवर सोबत घेऊन रेल्वेस्टेशनवरून घरी निघाले होते.

दरम्यान, पहाटे साडेचार ते पाच दरम्यान औरंगाबाद महामार्गावरील रॉयल फर्निचरजवळ दोघा भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या घटनेत लैलेशच्या डोक्‍याला व छातीला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी तिघांना परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. 

दुचाकीवर आदळले डोके
लैलेश हा ड्यूटी करून घराकडे दुचाकीने निघाला होता. रॉयल फर्निचरजवळ असताना समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीची जबर धडक बसली. यात लैलेशचे डोके व छाती समोरच्या दुचाकीवर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात ‘ट्रिपलसीट’ असलेल्या दुचाकीचे दोन तुकडे झाले. 
चौधरी कुटुंबाचा आधार गेला

लैलेशचे वडील अविनाश हे रेमंड कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांना मधुमेहाचा आजार असल्याने कुटुंबाचे रहाटगाडे हाकताना वडिलांची परिस्थिती लैलेशकडून बघवत नव्हती. तो दिवसा महाविद्यालयात व सोबतच्या मित्राबरोबर रात्री वृत्तपत्राच्या वितरण विभागात कामाला जाऊन स्वःताच्या शिक्षणाची व कुटुंबाची मदत करत होता. मामांसह नातेवाइकांनी शहरात दुसरीकडे काम शोधण्याचे देखील लैलेशला अनेकवेळा सांगितले होते, पण दिवसा शिक्षण व अभ्यासाला वेळ मिळत असल्याचे सांगून तो दुसरीकडे कामाला जाण्याचे टाळत होता. परंतु आजच्या घटनेत चौधरी कुटुंबाचा आधार गेल्याने रुग्णालयात वडील तसेच नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. 

बहिणीचा बस्ता आणि दुदैवी घटना
कुसुंबा येथील रहिवासी व नूतन मराठा महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षाला असलेला पंकज जाधव याच्या मोठ्या बहिणीचा आज जळगावला बस्ता होता. बस्त्यासाठी फत्तेपूरवरून मामा रेल्वेने जळगावला पहाटे चारला येणार होते. मामाला रेल्वेस्थानकावर घेण्यासाठी गावातील मित्र राहुल वाघ याला घेऊन दुचाकीने आला होता. मामाला घेऊन तिघे दुचाकीने गावाकडे परतत असताना घडलेल्या दुदैवी घटनेमुळे पंकजच्या बहिणीचा बस्ता रद्द करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com