सावधान इंडिया..' आपल्या शहरातही धोक्‍याची घंटा..! 

सावधान इंडिया..' आपल्या शहरातही धोक्‍याची घंटा..! 

"क्राईम पेट्रोल', "सावधान इंडिया'सारख्या मालिकांच्या प्रारंभी "सत्य घटनांवर आधारित..' असे स्लोगन भलेही येत असेल; मात्र त्यातील प्रसंग सत्य घटनांवर आधारित असतात की त्या मालिका समाजात "क्राइम प्लॅन' रचायला कारणीभूत ठरतात, हे शोधावे लागेल. ऐन सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जळगावात शनिवारी भरदिवसा पडलेला दरोडा पोलिसदलापुढे आव्हान ठरत असतानाच या दरोड्याच्या चौकशीत समोर येत असलेली तथ्ये पाहून "क्राइम पेट्रोल' आपल्या गावातही आल्याचा हा धोका नागरिकांनाही "सावधान रहे सुरक्षित रहे..' असा संदेश देणारा आहे. 
 
"टीव्ही-मोबाईल पिढी नासवतंय..' असे आपण नेहमीच म्हणत असतो. फावल्या वेळेत टीव्ही पाहणं, आणि आता त्यापुढे जाऊन मोबाईलवर खेळत राहणं हे नव्या काय आपल्या दोघा- तिघा पिढ्यांनी स्वीकारलंय. त्याच्या दुष्परिणामांवर अनेकवेळा कठोरपणे सर्वजण बोलताही, मात्र त्या दिवसाच्या सूर्यास्ताबरोबर ते बोलणंही अस्ताला जातं आणि दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयासोबत त्याच टीव्ही-मोबाईलसोबत आपली पुढची "इनिंग' सुरू होते... 
अशा या टीव्हीवर गेल्या काही वर्षांत दोन मालिका कमालीच्या "हीट' ठरल्यात. "क्राईम पेट्रोल' आणि दुसरी "सावधान इंडिया..' गुन्हेगारीच्या जगतावर याआधीही कधीकाळी गाजलेली मराठीतली "एक शून्य शून्य' आणि सोनी टीव्हीवरील सर्वांत लांबलेली "सीआयडी' मालिका आपण अनुभवली आहे. परंतु, क्राइम पेट्रोल अन्‌ सावधान इंडियासारख्या मालिका त्यातील अतिरंजित आणि अनोख्या घटनांनी जास्त चर्चेत राहिल्या. "क्राईम' अथवा "सस्पेन्स'वर आधारित अशा या प्रत्येक मालिकेत जिवंतपणा आणण्यासाठी मालिका सुरू होण्याआधी "सत्य घटनांवर आधारित' अशी "टॅगलाईन' येते. आता या मालिकांमधील कथांवरच सत्य घटना घडल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. जळगावात शनिवारी भरदिवसा डॉक्‍टरच्या घरी दरोड्याची घटना घडली. मोलकरीणनेच दरोड्याचा कट रचत स्वत:ही पीडित होण्याचा बनाव केला आणि एक-दोन नव्हे तब्बल सहा लाखांच्या ऐवजाचा दरोडा टाकण्यात दोघं तरुण यशस्वी ठरलेत.. 
या एकूणच घटनाक्रमात सुरवातीपासून संशय असल्याने पोलिसांनी मोलकरीणसह तिघांना ताब्यात घेतले आणि हा सारा प्रकार "क्राईम पेट्रोल'प्रमाणेच समोर आला. मालिकेतील कथेचा शेवट सकारात्मक करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असतो, तसा प्रयत्न या प्रत्यक्ष घटनेत पोलिसांनी केला आणि दरोडेखोरांना जेरबंद केले, ही जमेची बाजू म्हणावी लागेल. मात्र; या घटनेच्या निमित्ताने टीव्हीवरील मालिकांमधून समाज काय घेतोय, याची दुसरी आणि धोक्‍याची घंटा वाजविणारी नकारात्मक बाजू प्रकर्षाने समोर आली. हीच नव्हे तर अशा अनेक घटना आज घडू लागल्या आहेत. या घटनेनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शिवकॉलनीत दोन घरे फोडल्याचे प्रकार समोर आलेत. ऐन उत्सवाच्या काळात पोलिसांसाठी हे प्रकार डोकेदुखी ठरणार आहेत. 
सोशल मीडिया "ऍक्‍टिव्हेट' होऊन सायबर क्राइम पोलिसांसमोर आव्हान ठरत असताना आता "क्राईम पेट्रोल'सारख्या मालिकांमधून शिकत प्रत्यक्षात तशी गुन्हेगारी करणाऱ्यांची संख्या वाढतेय, ही समाजासाठीही डोकेदुखी ठरणार आहे. त्यातून "सावधान इंडिया..' असे म्हणत सर्वसामान्यांनाच "फाइटस्‌ बॅक..' करावे लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com