ओपिनियन मेकर - समाजाशी बांधिलकी असेल तरच शहराची प्रगती शक्‍य : रजनीकांत कोठारी

RAJANIKANT KOTHARI
RAJANIKANT KOTHARI

अनेक वर्षांपासून सातत्याने आपण त्याच त्या समस्यांवर चर्चा करीत आहोत. दर पाच वर्षांनी निवडणुका होतात, तीच ती आश्‍वासने दिली जातात... नगरसेवक, लोकप्रतिनिधी निवडून येतात, मात्र प्रचारातील आश्‍वासनांचा नंतर सर्वांनाच विसर पडतो... आणि समस्या व प्रश्‍न कायम राहतात. या सर्व समस्या प्रामुख्याने नागरी सुविधांशी संबंधित आहेत, त्यामुळे त्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. पालिकेत निवडून जाणाऱ्या नगरसेवकांची समाजाशी बांधिलकी असेल तरच हे प्रश्‍न सुटू शकतील व शहराची प्रगती होऊ शकेल. 
 
जळगाव शहरातच नव्हे तर सर्वच शहरांमध्ये नागरी सुविधांशी संबंधित समस्या आहेत. आपल्या शहरात त्या जास्त असाव्यात. अनेक वर्षांपासून त्यावर चर्चा होते, परंतु त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकत नाही. रस्त्यांची बिकट अवस्था, गटारे तुंबलेली, खुल्या जागांवर कचऱ्याचे ढीग, पालिकेच्या दवाखान्यांची दुरवस्था, स्वच्छतेच्या तक्रारी, मैदानांचा अभाव असे सध्या शहराचे चित्र आहे. सातत्याने सुरू असलेल्या या समस्या चुटकीसरशी सुटणार नाहीत, मात्र त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
शहरातील गाळेधारकांची समस्याही सहा वर्षांपासून कायम आहे. त्यावर कोणताही तोडगा निघालेला नसल्याने व्यापाऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे. व्यापाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तसे पालिकेचे नुकसानही होता कामा नये, असा मधला मार्ग या समस्येतून काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. गाळेधारकांचा प्रश्‍न सुटल्यास गाळेधारकांनाही दिलासा मिळेल आणि पालिकेच्या उत्पन्नाचा प्रश्‍नही सुटू शकेल. 
कर्जफेडीचा प्रश्‍नही अद्याप सुटू शकलेला नाही. आणि पालिकेच्या आर्थिक स्थितीमागे हे मुख्य कारण आहे. हुडको व जिल्हा बॅंकेच्या कर्जफेडीत दरमहा कोट्यवधींचा निधी जातो. परंतु, हे कर्ज अद्याप फिटू शकले नाही. त्यासाठी एकरकमी कर्जफेडीच्या प्रस्तावावर मनपा प्रशासन व सरकारने एकत्रित तोडगा काढायला हवा. पालिकेची कर्जमुक्ती झाल्याशिवाय विकासकामांना निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. एमआयडीसीतील उद्योजक नियमितपणे कर भरतात. अनेक वर्षांपासून एमआयडीसीत नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. मर्यादित स्वरूपात दिलेल्या सुविधांमुळे उद्योजक त्रस्त आहेत. बरेचसे उद्योग बंद पडलेत, त्यामुळे रोजगाराचाही प्रश्‍न निर्माण झाला. नवीन उद्योग आलेले नाहीत. पालिका व शासनाने त्यासाठी पूरक वातावरण तयार केले पाहिजे. उद्योगांना सवलती देऊन, प्रोत्साहन दिले पाहिजे. 
पालिकेत नव्याने निवडून जाणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागावर लक्ष केंद्रित करून त्यातील समस्यांवर तोडगा काढला, प्रामाणिक प्रयत्न केले तर शहराचे चित्र बदलू शकेल. त्यामुळे या सर्व लोकप्रतिनिधींची व अधिकारी- प्रशासनाचीही समाजाशी बांधिलकी असणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com