यार हमारा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो..! 

यार हमारा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो..! 

जळगाव : यार हमारा था वो.. उडती पतंग सा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो.. "थ्री इडियट्‌स' या गाजलेल्या चित्रपटातील हे गीत आजही गुणगुणताना तेवढेच मधूर वाटते. चित्रपटातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असलेले दोघे मित्र त्यांच्या असामान्य व्यक्तित्व असलेल्या मित्राच्या शोधात निघता तेव्हा हे गाणं "बॅकग्राउंड'ला वाजतं. सध्या महापालिका निवडणूक नावाची राजकीय पक्षातील विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगची परीक्षा आहे अन्‌ या परीक्षेचे "मॅनेजमेंट गुरू' समजल्या जाणाऱ्या प्रदीप रायसोनींबाबत "कहॉं गया उसे ढूंढो...' असे म्हणण्याची त्यांच्या शिष्यावर नक्कीच वेळ आलीय. 
प्रदीप रायसोनी. अनेक वर्षे नगरसेवक, नगराध्यक्ष, तत्कालीन पालिकेच्या उच्चाधिकार समितीचे सभापती, 2001 ते 2008 च्या काळात सक्रिय पालिका राजकारणातून थोडी विश्रांती.. अन्‌ पुन्हा 2008 मध्ये निवडणूक रिंगणात... विजयी होऊन महापालिका सभागृहात "एन्ट्री'... महापौरपद... असा रायसोनींचा पालिकेच्या राजकारणातील राजकीय प्रवास. सुरेशदादा जैनांचे कट्टर समर्थक, नव्हे तर उजवे हातच. 

निवडणुकांचे "मॅनेजमेंट गुरू' 
जैनांच्या सर्व राजकीय लढाया मग त्या पालिकेच्या असोत की, विधानसभेच्या... सर्व रायसोनींच्या अधिपत्याखालीच लढल्या जायच्या. किंबहुना जैनांच्या सर्वच राजकीय लढायांचे ते "मॅनेजमेंट गुरू'. शहराच्या प्रत्येक भागाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक सर्व प्रकारच्या रचनेची खडान्‌खडा माहिती. प्रतिकूल स्थितीतही पालिकेचा गाडा कसा हाकायचा, कोणत्या भागात किती व कशी विकासकामे करायची यापासून तर न्यायालयीन लढायापर्यंतच्या सर्व मोहिमांचे नेतृत्व रायसोनींकडेच असायचे. या वाटचालीत त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांच्या कार्यशैलीने असंख्य कार्यकर्ते जसे जोडले गेले, तसे काही जैनांपासून दूरही गेले. तरीही रायसोनींच्या नावाभोवतालचे "वलय' काही कमी झाले नाही. 

2012 नंतर पुन्हा अज्ञातवास 
असे असताना घरकुल प्रकरणात जैनांच्या आधी रायसोनींना अटक झाली, ती 2012 मध्ये. आणि तेव्हापासून ते अज्ञातवासात गेले. नंतर मग 2013 ची निवडणूकही जैन आणि रायसोनींच्या अनुपस्थितीतच रमेश जैन व नितीन लढ्ढांच्या नेतृत्वात लढविण्यात आली. घरकुल प्रकरणातील अटकेनंतर कारागृहात असताना एकदाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होणारा पहिला राजकीय नेता असावा हा... या प्रकरणानंतर मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेला वळण मिळाले आणि ते अज्ञातवासात गेले. आता जामिनावर बाहेर असतानाही ते पालिका निवडणुकीच्या धामधुमीपासून खूप दूर आहेत, त्यांनी स्वत:च दूर राहणं स्वीकारलंय. 
सर्वसामान्यांना मात्र रायसोनी कुठे आहेत, हे माहीत नाही. मात्र, त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि स्नेह असलेल्यांची संख्याही कमी नाही. पालिकेच्या राजकारणात खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंग करणारे प्रदीप रायसोनींबाबत "वो खूद अपनी राह बनाता..' असे म्हणणेही उचित ठरते. ज्या स्नेहिजनांना ते भेटत नाहीत त्यांच्या तोंडी या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र "यार हमारा था वो.. कहॉं गया उसे ढूंढो..' हे बोल आपसूकच येत आहेत. 

निकटवर्तीयांचे सल्लागार 
घरकुल प्रकरणातील खटल्याचा पूर्ण निकाल लागून दिलासा मिळत नाही तोवर राजकीय वर्तुळात यायचे नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तरीही या निवडणुकीच्या निमित्ताने काही इच्छुक निकटवर्तीय त्यांना जाऊन भेटत आहेत.. काय करायचे, कुठून उभे राहायचे यापासून तर आता कसे लढायचे, नियोजन कसे करायचे, याबाबत त्यांच्याकडून ते सल्ला घेताहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com