"रेनवॉटर हार्वेस्टिंग' म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान... 

live photo
live photo

जळगाव ः राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी "रेनवॉटर हार्वेस्टिंग'ही सिस्टिम बसविण्याचे आदेश देण्यात आले. जळगावात मात्र "लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' याची प्रचिती येत आहे. शहरातील एकाही शासकीय कार्यालयात पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी उपाययोजना नसल्यामुळे छतावर पडणारे लाखो लिटर पावसाचे पाणी वाहून जात असल्याचे चित्र आहे. 

पावसाचे छतावरून पडणारे पाणी वाहून जाऊ न देण्यासाठी "रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम' आणण्यात आली. जलयुक्त शिवार योजना पावसाचे पाणी अडविण्यासाठी आणि अडलेले पाणी शेतशिवाराला बहरविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. दुसरीकडे काही अपवाद वगळता शासकीय इमारतींवर पावसाचे पाणी अडवून जिरविण्याची यंत्रणा अर्थात, रूफ/रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत शासकीय यंत्रणेलाच वावडे असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांच्या इमारतीचा आढावा घेतला असता कोणत्याही इमारतीवर "रेनवॉटर हार्वेस्टिंग' यंत्रणा कार्यान्वित नाही. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा निकामी 
शासकीय कार्यालयांच्या इमारतींपैकी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीवर काही वर्षांपूर्वी "रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मुख्य इमारतीच्या कौलांवरून खाली येणारे पाणी चार वेगवेगळ्या पाइपद्वारे दोन ठिकाणी साठविण्यासाठी त्या ठिकाणी दोन शोषखड्डेही करण्यात आले होते. काही वर्षे ही यंत्रणा सुरू होती. मात्र, त्यानंतर काहीतरी समस्या उद्‌भवल्याने ही यंत्रणा निकामी झाली, ती आजपर्यंत तशीच आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जाते. 

जिल्हा परिषदेला विसर 
जिल्हा परिषदेच्या नवीन आणि जुनी अशा दोन इमारती आहेत. या दोन्ही इमारतींना "रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची प्रणालीच नाही. बांधकाम विभागाकडे याची सर्वस्वी जबाबदारी असताना याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेची जुनी इमारत ही ब्रिटिशकालीन असल्याने ती कौलारू स्वरूपात आहे. यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी हे कौलांवरून थेट वाहून जाते. 
जिल्हा रुग्णालयाच्या तीन मजली इमारतींनाही रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रणाली लावण्यात आलेली नाही. इमारतीचे छतावरील पाणी थेट खाली येऊ नये; याकरिता पाइप लावण्यात आले आहेत. सर्व पाणी एका पाइपद्वारे जमिनीवर उतरविण्यात आले असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे पावसाळ्यात इमारतींवर पडणारे लाखो लिटर पाणी हे वाहून जाताना दिसते. 
 
महापालिकाही उदासीनच 
महापालिकेच्या मालकीच्या बहुतांश इमारतींना "वॉटर हार्वेस्टिंग' यंत्रणा बसविली गेली नसल्याची बाब 
समोर आली आहे. महापालिकेची टोलेजंग प्रशासकीय इमारत, सहा रुग्णालयांच्या इमारती, प्रभाग कार्यालयांच्या चार इमारती, महापालिकेच्या पंचवीस शाळा अशा जवळपास 35 ते 40 इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com