समृद्ध केळीपट्ट्यास नैसर्गिक आपत्तीचे "ग्रहण' 

समृद्ध केळीपट्ट्यास नैसर्गिक आपत्तीचे "ग्रहण' 

जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार उत्पादनाच्या आधारे निर्यातक्षम केळी उत्पादन झाल्याने विदेशातही जळगावची ओळख केळीच्या रूपाने झाली, ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल... तर एकूणच जिल्ह्याला समृद्ध बनविणारा हा घटक. 
दुर्दैवाने गेल्या दोन दशकांपासून अवकाळी पाऊस, गारपीट, विविध रोग, वाहतुकीतील अडचणी यामुळे केळीच्या समृद्ध बागा ओसाड होत चालल्या आहेत. ज्यांना या बागांनी आर्थिक बळ, सुबत्ता देऊन उत्पादक म्हणून प्रस्थापित केले ते शेतकरी आत्महत्या करू लागले. प्रयत्न करूनही या संकटांमधून बाहेर निघता येत नाही, अशी केळी उत्पादकांची अवस्था. अशावेळी समाज म्हणून लोकप्रतिनिधी, प्रशासन अन्‌ शासनाने हात दिल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा केळीचा जिल्हा म्हणून ओळख पुसली जाण्याचीच शक्‍यता अधिक आहे. 
 
जळगाव आणि रावेर हे आता केवळ भारतातच नव्हे; तर आखाती देशात आणि युरोपात दर्जेदार केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध झाले आहे. आता केळी हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा विषय झाला आहे. केळी हा येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. केळीला योग्य भाव मिळाला तर येथील शेतकरी खूश! त्यामुळे येथील बाजारपेठेत तेजीचे वातावरण राहते. 
केळीचे भाव कोसळल्याने किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर बाजारपेठेवर अवकळा पसरते. केळीवर येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. चांगला भाव मिळाला की मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, चारचाकी गाडी आणि घरही होते. पण फटका बसला तर कर्जाच्या ओझ्याखाली दबून शेतकरी चार-पाच वर्षे मागेही ढकलला जातो. केळी हा येथील प्राण आहे. पण राजकारणी त्यांच्या प्रश्‍नांकडे गंभीरपणे पाहत नाहीत; प्रसंगी या प्रश्‍नावरून राजकारण होते, आश्‍वासनांची खैरात होते आणि नंतर पुन्हा "येरे माझ्या मागल्या'. 
अनेक नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीची भरपाई दोन-दोन वर्षे मिळत नाही. मिळते ती नाममात्र. तरीही येथील शेतकरी स्वबळावर नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपली केळी दर्जेदार, अवीट केळी सातासमुद्रापार निर्यात करतोय. त्याला शासनाने, लोकप्रतिनिधींनी साथ दिली तर आपला जिल्हा, आपला देश जगातील एक अग्रगण्य केळी निर्यातदार देश म्हणून ओळखला जाईल. 
 
जिल्ह्यातील केळी निर्यात 
जिल्ह्यातील प्रमुख केळी निर्यातदारांमध्ये जैन इरिगेशन, महाजन बनाना एक्‍स्पोर्ट, एकदंत बनाना एक्‍स्पोर्ट, महाराष्ट्र केला यांचा समावेश होतो. या अन्य फर्म्स मिळून यावर्षी जिल्ह्यातून किमान सहाशेपेक्षा जास्त कंटेनर केळी निर्यात झाली आहे. ही सुमारे बारा हजार टन केळी असून, तिची किंमत सुमारे दीडशे कोटी रुपये आहे. 

यांची उपजीविका थेट केळीवर अवलंबून 
केळी उत्पादक शेतकरी, सालदार किंवा महिनदार, शेतातील मजूर, केळीची कापणी, वाहतूक करून ट्रकमध्ये भरणारे मजूर, केळी बियाणे व्यवसाय करणारे मजूर आणि ठेकेदार, केळीच्या पानांचा व्यवसाय करणारे मजूर, किरकोळ केळी विकणारे विक्रेते, केळीसाठी विविध सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचारी, केळी ग्रुपचालक व कर्मचारी व या सर्वांचे कुटुंबीय. 

जिल्ह्यातून निर्यात 
सुमारे दहा वर्षांपूर्वी केळीची विदेशात निर्यात हे येथील शेतकऱ्यांचे स्वप्न होते. त्यावेळी येथील केळी उत्तर भारतात दिल्ली आणि कानपूर येथे रेल्वेने पाठविली जाई. याव्यतिरिक्त उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थान, जम्मू आणि काश्‍मीरमध्ये ट्रकद्वारे वाहतूक होई. रेल्वेद्वारे वाहतुकीतही जुन्या पारंपरिक वॅगन्स, व्हीपीयू वॅगन्स, वातानुकूलित (एअर सर्क्‍युलेटेड वॅगन्स) असे प्रकार होते. अनेक अडचणी आल्याने गेल्या चार-पाच वर्षांपासून रेल्वेने केळी वाहतूक बंद आहे. सुमारे पाच-सात वर्षांपासून येथील केळी पाकिस्तानात ट्रकद्वारे निर्यात होण्यास सुरवात झाली. टप्प्या-टप्प्याने दुबई, इराण, इराक, तेहरान, मस्कत, सौदी अरेबिया येथे निर्यात सुरू झाली. अर्थात शेतकरी येथीलच व्यापाऱ्यांना केळी विकतात. निर्यातदार व्यापारी या व्यापाऱ्यांकडून खरेदी करतात. म्हणजे शेतकऱ्यांना आपली केळी थेट निर्यात करता येत नाही. या व्यापारात मध्यस्थाची संख्या अधिक आहे. 
 
येथेही निर्यात शक्‍य 
जिल्ह्यातील शेतकरी आता निर्यातक्षम आणि दर्जेदार केळी उत्पादन करतात यावर "चिकिता'सारख्या अमेरिकन कंपन्यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. मात्र कापणीपश्‍चात हाताळणी, पॅकिंग आणि वाहतूक यात अधिक सुधारणा केली तर जिल्ह्यातील केळी रशिया, जपान, सिंगापूर, हॉंगकॉंग, युरोप येथे मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊ शकेल. अफगाणिस्तान हा देखील केळीचा मोठा आयातदार देश आहे. मात्र भारताचे पाकिस्तानशी चांगले संबंध नसल्याने त्यावर मर्यादा आहेत. अफगाणिस्तान येथे सागरी मार्गाने तुरळक निर्यात होते मात्र पाकिस्तानमार्गे रस्त्याने वाहतूक झाली तर निर्यातीत मोठी भर पडेल. यासाठी प्रगत शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 
 
उत्पादनाबाबत समस्या 
तसे पाहायला गेले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी उत्पादनाबाबत फारशा समस्या नाहीत. मात्र, उत्पादन झाल्यानंतर उभी राहिलेली केळी काहीवेळा अवेळी पाऊस, वादळ, गारपिटीने क्षणात उद्‌ध्वस्त होते. बागाच्या बागा झोपून जातात. अशावेळी केळी उत्पादकांना मदतीसाठी शासन धजावत नाही. वीजपुरवठा नियमितपणे व्हावा, उन्हाळ्यात भारनियमन होणार असले तर त्याचे नियोजन हिवाळ्यातच जाहीर व्हावे, दर्जेदार, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी शासनाने विविध प्रकारचे अनुदान, प्रोत्साहन द्यावे, अशा अपेक्षा आहेत. 


जिल्ह्यातील केळी लागवड (2017-18) 
 
तालुका----------हेक्‍टर 
जळगाव----------4562 
भुसावळ----------708 
बोदवड----------205 
यावल----------9952 
रावेर----------18215 
मुक्ताईनगर----------4610 
अमळनेर----------139 
चोपडा----------4600 
एरंडोल----------110 
धरणगाव----------536 
पारोळा----------36 
चाळीसगाव----------340 
जामनेर----------769 
पाचोरा----------517 
भडगाव----------981 
एकूण----------46280 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com