सहकार राज्यमंत्री पाटील यांचे दररोज सकाळी "वॉकिंग' 

सहकार राज्यमंत्री पाटील यांचे दररोज सकाळी "वॉकिंग' 

शिवसेनेची खानदेशातील मुलूखमैदान तोफ म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची राज्यात ओळख आहे. त्यांचा आवाज आजही खणखणीत असून, शारीरिकदृष्ट्याही ते तंदुरस्त आहेत. दररोज सकाळी "वॉकिंग' करणे हेच त्यांच्या दिवसभराच्या उर्जेचे रहस्य आहे. 
 
राजकारणाचा गंध नसलेल्या घरात जन्मलेले गुलाबराव पाटील शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेनेत सहभागी झाले. साधा शिवसेना कार्यकर्ता, आमदार ते सहकार राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. खणखणीत आवाजाने त्यांनी अनेक सभा गाजवल्या. त्यामुळेच जनतेत त्यांची "खानदेशी मुलूखमैदान तोफ' अशी ओळख आहे. सध्या ते सहकार राज्यमंत्री असल्याने त्यांच्या कामाचा व्याप वाढला आहे. मात्र, यातूनही ते आपल्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष पुरवितात. 

सकाळी "वॉकिंग' 
कामात कितीही व्यस्त असले, तरी पहाटे साडेपाचला उठतात. ट्रॅकसूट, स्पोर्टशूज घालून ते वॉकिंगला निघतात. घरी पाळधीत असल्यास घरापासून बायपास हायवेपर्यंत साधारण तीन किलोमीटर ते चालतात. तेथून चालतच घरी परततात. घरी आल्यावर थोडा व्यायाम करतात. त्यानंतर नाश्‍ता आणि कार्यकर्त्यांशी गप्पा झाल्यावर दहाला मतदारसंघात फिरण्यासाठी निघतात. अगदी मुंबईत असल्यानंतरही ते सकाळचे चालणे चुकवत नाही. आमदार निवासापासून मलबार हिलपर्यंत ते चालत जातात. त्या ठिकाणी व्यायामानंतर निवासस्थानी येऊन त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळचा व्यायाम ते कधीच चुकवत नाही. रात्री दोनला झोपले, तरी न चुकता ते पहाटे साडेपाचला उठतात. पोहण्याचा व्यायामही ते करीत होते. पाळधीतील कासट यांच्या फार्मवरील तलावात ते पोहण्यासाठी जायचे. मात्र, पाण्यातील केमिकलमुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी आता पोहणे बंद केले आहे. आहारातही त्यांनी तेलकट तसेच बाहेरचे खाणे वर्ज्य केले आहे. बाहेरगावी जायचे असल्यास ते घरूनच कळण्याची भाकरी, चटणी असा डबा सोबत घेतात. 

पाटील यांचा फिटनेस फंडा 
* पहाटे साडेपाचला "वॉकिंग' 
* सकाळी हलका नाश्‍ता 
* जेवणात तेलकट पदार्थ वर्ज्य 
* बाहेरगावी असल्यास घरूनच जेवणाचा डबा 


राजकारणात काम करताना वेळेचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे जेवण वेळेवर होईलच, याची शाश्‍वती नसते. त्यामुळे फिटनेससाठी दररोज सकाळी "वॉकिंग' आपण न चुकता करतो. यामुळे दिवसभर न थकता काम करू शकतो. 
- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com