शिवसेनेच्या स्वबळात नेतृत्वाचीच कसोटी

residentional photo
residentional photo

जळगाव : "कोण आला रे, कोण आला... शिवसेनेचा वाघ आला...' अशी घोषणा दुमदुमली, की शिवसैनिकांत चैतन्य निर्माण होते. याच चैतन्याच्या बळावर युवक संघटित करून राज्यात शिवसेना वाढली. जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेला चांगले बळ मिळाले. मात्र, सेनेचे बोट धरून मोठे झालेल्या भाजपची ताकद आज सेनेपेक्षा निश्‍चितच जिल्ह्यात अधिक आहे. विधानसभेत युती तुटली, दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. जिल्ह्यात सेनेचे फक्त तीन आमदार निवडून आले; तर पाच आमदारांसह भाजपने सेनेला मागे टाकले. जिल्हा परिषदेतही सेनेला भाजपने सत्तेतून बेदखल केले. आता लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढविण्याची शिवसेनेकडूनच घोषणा करण्यात येत आहे. त्यांची तयारीही सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत खऱ्या अर्थाने सेनेच्या स्थानिक नेतृत्वाची कसोटी लागणार आहे..! 


जळगाव जिल्ह्यात आज भारतीय जनता पक्ष राजकीय बळात क्रमांक एकवर आहे. त्या खालोखाल शिवसेनेचा क्रमांक लागतो. एकेकाळी भाजप जिल्ह्यात फारसा ताकदवान नव्हता. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर शिवसेना मोठा भाऊ आहे, असे म्हणत भाजपने आपले बळ वाढविले. भाजपच्या शिस्तबद्ध यंत्रणेमुळे शिवसेनेच्या पुढे भाजप कधी निघून गेली, हे विधानसभा स्वतंत्र लढल्यावरच शिवसेनेला कळालं. परंतु, त्या अगोदरही शिवसेना जिल्ह्यात जागी झाली होती. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यात येत होत्या. यातही भाजप नेहमीच सेनेपेक्षा जास्त जागा मिळवून क्रमांक एकवर होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह महत्त्वाची खाती भाजपकडेच होती. जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या बळावर भाजपने ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. त्यामुळे लोकसभेतही गेल्या निवडणुकीपर्यंत युती असताना भाजपने दोन्ही जागा आपल्याकडेच ठेवल्या. शिवसेना मात्र त्यांना साथ देवून दोन्ही ठिकाणी भाजपचे खासदार इमानेइतबारे निवडून देत आहे. त्यामुळे शिवसेनेला लोकसभेतील आपली ताकद कधीच कळली नाही. यावेळी मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी लोकसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपली ताकद दाखविण्याची संधी तर आहेच, शिवाय जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचीही ही परीक्षा ठरणार आहे. 

जळगावसाठी जय्यत तयारी 
जिल्ह्यात रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघ आहे. आजपर्यंत युतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका लढल्या जात होत्या. भाजपकडे दोन्ही जागा असल्यामुळे सेनेला जिल्ह्यात लोकसभा लढण्याचा अनुभव नाही. त्यामुळे शिवसेनेला तयारी मोठी करावी लागणार आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकीय बळाचा विचार केल्यास जळगाव मतदारसंघात सेनेची ताकद मोठी आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा या ठिकाणी सेनेचे आमदारच आहेत; तर जळगावात माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्यामुळे सेनेची ताकद आहे. पारोळ्यात माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेना भक्कम आहे. अमळनेर, चाळीसगाव तालुक्‍यात ग्रामीण भागात पक्षाची ताकद आजही चांगली असल्याचे दिसून आले आहे. जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेने उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. त्या दृष्टीने त्यांची तयारीही सुरू आहे. जिल्ह्यात कोणत्याही पक्षाची तयारी नसताना जळगाव मतदारसंघात मात्र शिवसेना उमेदवारासह जय्यत तयारीत असल्याचे दिसत आहे. 

रावेरमध्ये होणार कसरत 
रावेर लोकसभा मतदारसंघात मात्र शिवसेना फारशी ताकदवान दिसत नाही. या ठिकाणी चोपडा येथील एकमेव मतदारसंघ वगळता सर्वच चार विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना उमेदवाराचा शोधही घ्यावा लागणार आहे. विधानसभानिहाय विचार केल्यास भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर-यावल भागात पक्षाला अधिक जोर लावावा लागणार आहे; तर जामनेर मतदारसंघात पक्षाला शून्यापासूनच सुरवात करावी लागणार आहे. या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांना लक्ष घालावे लागणार आहे. तरच रावेर लोकसभा मतदारसंघातील लढाईत शिवसेना भाजपला टक्कर देवू शकेल. 

दोन्ही लोकसभा लढताना शिवसेनेची कॉंग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा भाजपशीच अधिक टक्कर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी उचलावी लागणार आहे. त्यांच्या भाषणशैलीमुळे भाजपवर आक्रमण करण्याची त्यांची ताकद आहे. या शिवाय माजी आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावच नव्हे, तर रावेर लोकसभेतही ताकद लावावी लागणार आहे. याशिवाय आमदार चंद्रकांत सोनवणे चोपडा मतदारसंघातील आपल्या बळकटीने रावेर मतदारसंघात शिवसेनेला ताकद देवू शकतील; तर पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा विकासाच्या मॉडेलच्या माध्यमातून जळगाव लोकसभेत शिवसेनेची छाप पाडू शकतील. सहकार क्षेत्रातील जाणकार माजी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. त्या बळावर ते दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराला ताकद देवू शकतील. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही शैली आक्रमक आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये पक्षाला बळ मिळेल. जिल्ह्यात शिवसेनेच्या नेतृत्वाचे बळ मोठे दिसत आहे. मात्र ते प्रत्यक्षात रणांगणावर दिसण्याची गरज आहे. 

नेतृत्वाची हीच खरी कसोटी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा शिवसेना स्वतंत्र लढल्यास उमेदवाराच्या विजयापेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वाच्या ताकदीची खरी कसोटी आहे. सभागृहात भाजपला हे नेते नेहमीच आव्हान देत असतात. परंतु रणांगणावर लढून भाजपवर मात करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. त्यांनी यात यश मिळविले, तर निश्‍चितच आगामी काळात शिवसेनेसह या नेत्यांचीही ताकद वाढणार आहे. परंतु, अयशस्वी झाल्यास त्याचा पक्षावर तर परिणाम होईल आणि पुढे विधानसभा निवडणुकीसाठीही शिवसेनेला ते अडचणीचे ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com