स्मार्ट व्हिलेज केवळ बोर्डापुरते

residentional photo
residentional photo

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी "लॅब टू लॅंड'चा गाजावाजा करीत खानदेशातील पाच गावे दत्तक घेतली खरी; पण त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात या गावांसाठी सोयीसुविधांची उपलब्धता ते करू शकले नाहीत. केवळ गावांमध्ये चार सौरदिवे आणि काही ठिकाणी त्यासह एक-दोन संगणक एवढ्यावरच त्यांची दत्तक योजना थांबली. गंमत म्हणजे दत्तक गावांच्या बाहेर आपले बोर्ड लावायला विद्यापीठ अजिबात विसरले नाही. येत्या काळात तरी विद्यापीठाने या गावांच्या पदरात काही सुविधा पडतील, यासाठी ठोस कालबद्ध कार्यक्रम आखणे गरजेचे झाले आहे. संबंधित ग्रामस्थांनीही तीच अपेक्षा "सकाळ'कडे व्यक्त केली आहे. 

भगदरीच्या पदरी उपेक्षितच 
नंदुरबार : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सातपुडा भागातील भगदरी, राजबर्डी (ता. अक्कलकुवा) ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. त्याचा एक भाग म्हणून गावांच्या विकासाची, त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी विद्यापीठाने घेतली होती. त्यासाठी "स्मार्ट व्हिलेज' म्हणून एक संकल्पना राबवण्यात आली. त्यात भगदरीत समाजशास्त्र महाविद्यालयाचे 45 विद्यार्थी या गावाला आले होते. त्यांनी 15 दिवस मुक्काम केला. या गावात सर्व्हे केला. गावातून सामाजिक, आर्थिक माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर हे विद्यार्थी जसे सर्व्हे करून गेले, तसे अद्याप परतले नाहीत किंवा त्यांचा अहवाल गावाला दिसला नाही. दत्तक राजबर्डी गावाला विद्यापीठाने एक घरघंटी (पिठाची छोटी चक्की) देण्यात आली आहे. त्याचा उपयोग होत आहे. त्याचबरोबर काही किरकोळ वस्तूही दिल्या आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून विद्यापीठात दोन बैठका झाल्या आहेत. त्याचबरोबर डॉ. मेश्राम यांचा कार्यकाळ पूर्ण होताच योजना बासनात गुंडाळल्यासारखी झाली आहे. 

ऊसमळी उरले शिबिरांपुरते 
यावल : तालुक्‍यातील ऊसमळी या दत्तक गावाला वीस लाखांपर्यंत निधी देऊन गावाचा विकास साधला जाईल, असे सुरवातीला विद्यापीठाकडून सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात गावाची झोळी रीतीच राहिली आहे. या गावात आता दरवर्षी यावल व रावेर तालुक्‍यातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उन्हाळी शिबिरांतून श्रमदान, आरोग्य विषयी जनजागृती, बॅंकिंग व्यवहार विषयी माहिती व जनजागृती, नाला बंधारीकरण, रस्ते दुरुस्ती या माध्यमातून श्रमसंस्कृती तेवढी राबविली जात आहे. येथे घेतली जातात. आदिवासी वस्तीवरील निरक्षरांना साक्षर करणे, शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना शिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देणे दत्तक योजनेत अपेक्षित होते. याच अपेक्षेवर ऊसमळीचे आदिवासी आजही विसंबून आहेत. मात्र असा कोणताही प्रयत्न विद्यापीठाकडून झालेला नाही. ऊसमळीसाठी विद्यापीठाने निधी द्यावा म्हणून ग्रामपंचायत सरंपचांसह सदस्यांनी वेळोवेळी विद्यापीठाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांच्या नशिबी निराशाच पडली आहे. ज्या ज्या वेळेस शासनाकडून या गावासाठी निधी प्राप्त होईल, त्या त्या वेळी त्या विकास कामावर निधी खर्च केला जाईल, अशी विद्यापीठाची भूमिका आहे. 

दत्तक गावांसाठी पाच लाख 
"उमवि'ने खानदेशातील पाच गावे दत्तक घेतली असून, या गावांसाठी यंदाच्या अंदाजपत्रकात पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या रकमेचा योग्य वापर करण्यासाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली येत्या दोन महिन्यात समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कामांना सुरवात होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. यापूर्वी या गावांमध्ये विद्यापीठाने सौर प्रकाशदीप लावले आहेत. 
 

दत्तक गावांना काय मिळाले 
भगदरी (ता. अक्कलकुवा) 
- 20 खुर्च्या 
- 5 सौर दिवे 
- 1 टेबल 
- 1 कपाट 
 
ऊसमळी (ता. यावल) 

संगणक 

सौर पथदिवे 


विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या सभेत आपण या विषयावर प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, भगदरी आणि राजबर्डी गावाला किरकोळ वस्तू मिळाल्या आहेत. 
प्रा. दिनेश खरात, सिनेट सदस्य,  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 

भगदरीचा 45 विद्यार्थ्यांनी 15 दिवस सर्व्हे केला. पुढे काय झाले ते कळले नाही. या गावांच्या विकासाकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष होत आहे. 
 डॉ. नरेंद्र पाडवी माजी आमदार, अक्कलकुवा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com