निवडणुकीतील पैशाचा वापर भविष्यात घातक : हेमेंद्र महाजन 

निवडणुकीतील पैशाचा वापर भविष्यात घातक : हेमेंद्र महाजन 

जळगाव : "मतदान' हा शब्द आता बदलण्याची गरज आहे, त्यातील "दान' या शब्दाचे महत्त्वच संपण्याची स्थिती आजच्या निवडणुकीतील "आर्थिक' उलाढालीमुळे निर्माण झाली आहे. मात्र या प्रक्रियेचा फटका जनतेलाच बसणार आहे. या प्रक्रियेमुळे यश मिळत असेल, पण खरोखरच मूलभूत सुविधांची तरी कामे होतील काय? हाच विचार करण्याची गरज आहे. मात्र सुशिक्षित युवकांनी आगामी काळात राजकारणात येताना आर्थिक पाठबळ निर्माण करूनच यावे, असे स्पष्ट मत हेमेंद्र संजय महाजन यांनी व्यक्त केले. 
महापालिका निवडणुकीत बळिरामपेठ, शनिपेठ, नवीपेठ भागातील प्रभाग 5 (अ)मधून हेमेंद्र संजय महाजन हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रथमच निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र ते पराभूत झाले. त्यांना 1326 मते मिळाली. पराभव झाला असला तरी आपल्याला या निवडणुकीमुळे प्रशिक्षण मिळाले, असे मत महाजन यांनी व्यक्त केले आहे. 
महाजन यांच्या घराण्यात कला, समाजकार्य आणि राजकारणाचा वारसा आहे. त्यांचे आजोबा (कै) आनंदराव महाजन हे आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाचे संस्थापक आहेत. तसेच ते नगरसेवक होते. पुढे हाच वारसा त्यांचे वडील (कै.) संजय महाजन यांनीही चालविला. तेही याच प्रभागात नगरसेवक होते. आपल्या घराण्याचा हाच वारसा पुढे चालविण्यासाठी हेमेंद्र महाजन यावेळी प्रथमच महापालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. त्यांचे शिक्षण बी. काम. (प्रथम वर्ष) पर्यंत झाले आहे. प्रभागात सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. 
राजकारणातील प्रवेशाबाबत ते म्हणतात, आमच्या घराण्यात समाजकार्याचा वारसा आहे. आजोबा, वडील यांनी नगरसेवक म्हणून या प्रभागात कार्य केले आहे. तसेच आपणही प्रभागात कार्य करीत होतो. त्याची पावती आपणास मिळेल, याची निश्‍चित खात्री होती. मात्र आजच्या पक्षीय राजकारणाची स्थिती आणि होत असलेली मोठी आर्थिक उलाढाल यामुळे समाजकार्य त्यापुढे फिके पडते, असे आपले मत झाले आहे. आपण "राष्ट्रवादी'चे उमेदवार होतो. मात्र पक्षीय पातळीवरही नेतृत्वाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याची आपली तक्रार आहे. परंतु त्यापेक्षाही आर्थिक बलाढ्य उमेदवाराकडून आर्थिक होत असलेली उलाढाल चक्रावणारीच आहे. त्यामुळे नवखा सुशिक्षित उमेदवार निश्‍चितच हतबल होतो. मात्र एवढी मोठी आर्थिक उलाढाल करून निवडून येणारा उमेदवार "विकास' कामे करणार काय? हाच मोठा प्रश्‍न आहे. परंतु हे सर्व बदलण्याची गरज आहे. कारण हे भविष्यातील राजकारणासाठी घातक आहे हे निश्‍चित आहे. 

समाजकार्यासह पुन्हा निवडणूक लढविणार 
युवकांनी राजकारणातील आजची स्थिती बदलण्याची गरज आहे. कसे बदलेल, हे मात्र माहिती नाही. परंतु आपण खचलेलो नाही, आपण पुढच्या वेळेस समाजकार्यासोबतच आर्थिक पाठबळ उभे करून निवडणूक लढवून यश मिळविणार आहोत. याची आपल्याला खात्री आहे. परंतु सुशिक्षित युवक-युवतींनी राजकारणात आलेच पाहिजे. निवडणूक लढविली पाहिजे. परंतु त्यांनी प्रथम आपली आर्थिक ताकद निर्माण करावी. तरच निवडणुकीच्या मैदानात उतरावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com