खामशेतकरांसाठी दमणगंगा नदीवर पूल मंजूर 

residenational photo
residenational photo

नाशिकः जीव मुठीत घेऊन दररोज दमणगंगा पार करण्यासाठी ओंडके अन्‌ पातेल्यांचा उपयोग कराव्या लागणाऱ्या खामशेतकरांच्या (ता. पेठ) व्यथा "सकाळ'ने मांडली. अखेर दमणगंगा नदीवर 90 मीटर लांबीचा पूल अन्‌ दोन्ही बाजूचे रस्ते मंजूर झालेत. या प्रकल्पासाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली असून यंदाच्या पावसाळ्याच्या अगोदर पुलाची उभारणी करण्याचा यंत्रणेचा मानस आहे. 
नद्याजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र-गुजरातच्या हक्काच्या पाण्याचा वाद धुमसतोय. पण दोन्ही राज्यांच्या सीमेवरील खामशेत पाड्यावरील आदिवासींना पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा "सकाळ'ने 12 ऑगस्ट 2017 रोजीच्या अंकातील वृत्ताद्वारे उपस्थित केला होता. गाव तिथं रस्ता झाल्याचे ढोल बडवण्यात येताहेत. पण नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकराशे लोकसंख्येच्या आदिवासींना दमणगंगा नदी पार करण्यासाठी पूल सोडाच रस्ताही उपलब्ध नाही. चारही बाजूने डोंगरांनी वेढलेला हा पाडा टेकडीवर वसला आहे. पाड्यासाठी जवळची बाजारपेठ पेठ असून पावसाळ्यात खळखळणारी नदी अन्‌ हिरवीकंच निसर्गराजी पाहताना आपण हिमालयात असल्याची धारणा प्रत्येकाची झाल्याखेरीज राहत नाही. पाड्याजवळून वाहणाऱ्या दमणगंगेचे विस्तीर्ण पात्र असून इथे पाच नद्यांचा संगम होतो. पाड्यावर जाण्यासाठी प्रत्येकाला नदी ओलांडावी लागते. इथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेत जाण्यासाठी शिक्षकांनाही पोहून जावे लागते. पुढील शिक्षणासाठी इथल्या मुलांना पेठ अथवा हरसूलला जावे लागते. हरसूल-पेठ बसगाडी कधी येते, तर अनेकदा येत नाही. त्यामुळे रुग्ण दगावतात. 

स्वातंत्र्यानंतर पहिली सुविधा 
"सकाळ'च्या दणक्‍यामुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा दळवळणाची सुविधा होत आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ता आणि पुलाचे काम मंजूर झाले आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्यासाठी 72 लाख, तर चार मीटर उंचीच्या पूलासाठी 1 कोटी 87 लाख रुपये खर्च होतील. रस्ते आणि पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. सध्यस्थितीत दमणगंगा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्याने कामातील अडथळा दूर झाला आहे. हे काम सुरु झाल्याने स्थानिक आदिवासींनी आनंद व्यक्त करत "सकाळ'ला धन्यवाद दिलेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com