congress shivsena
congress shivsena

नंदुरबारमध्ये काँग्रेस-शिवसेना युतीचा विजय

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तीन पालिकांसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला असून, नंदुरबार पालिकेत शिवसेना आणि कॉंग्रेस युतीचा विजय झाला. तर तळोदा पालिकेत सत्ता पालट झाली. गेल्या काही काळात काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पालिकेवर भाजपने हुकूमत दाखवत सत्ता काबिज केली. नवापूर पालिकेवर मात्र कॉंग्रेसने सत्ता कायम राखली आहे. 

काँग्रेस आणि शिवसेना युतीने पालिकेतील 27 जागांवर विजय मिळवून पालिकेवर सत्ता मिळविली आहे. तर भाजप- रिपाइं यांच्या 12 जागा निवडून आल्या. पालिकेवर नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी यांनी 4 हजार 781 मतांनी विजय मिळविला. 

नवापुर पालिकेवर कॉंग्रेसची सत्ता कायम 
नवापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी कॉंग्रेस पक्षाच्या हेमलता पाटील 1 हजार 742 मतांनी विजयी झाल्या असून, पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या 20 जागांपैकी 14 जागांवर कॉंग्रेसचे नगरसेवक विजयी झाल्याने पालिकेवर पुन्हा कॉंग्रेसची सत्ता कायम राहिली. तर चार राष्ट्रवादी कॉंग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे उमेदवार विजयी झाले. तर भारतीय जनता पक्षाला खाते देखील उघडता आले नाही. 

नवापूर पालिका निवडणुकीत 95 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात होते. नवापूर विकास आघाडी पक्षाचे नगराध्यक्षांसह दहा उमेदवार दिले होते. मनसे, बहुजन समाज पार्टीने नगराध्यक्ष पदासह दोन जणांना उमेदवारी दिली होती. मनसे, समाजवादी पार्टी, एमआयएम आदी पक्ष निवडणूक रिंगणात होते. मात्र, यापैकी कोणीही खाते उघडू शकले नाही. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी हेमलता पाटील (कॉंग्रेस) 7911, ज्योती जयस्वाल (भाजप) 4041 तर अर्चना वळवी (राष्ट्रवादी) यांना 61 मते पडली. 

तळोदा पालिकेत भाजपची सरशी

खानदेशातील जुनी पालिका म्हणून तळोदा पालिका 167 वर्ष जुनी ब्रिटिशकालीन तळोदा पालिका आहे. तळोदा पालिकेचा मागील काळात सर्वाधिक सत्ता कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पण, यंदाच्या निवडणुकीत तळोदा पालिकेत नगराध्यक्षपदी भाजपचे अजय परदेशी तर एकूण 18 पैकी भाजपचे 11 नगरसेवक विजयी झाले. यामुळे तळोदा पालिका निवडणुकीत भाजपची सरशी झाली असून, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या भरत माळी यांचा 1 हजार 795 मतांनी पराभव करत भाजपचे अजय परदेशी यांनी विजय मिळविला. एकूण अठरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 11 ठिकाणी विजय मिळविला. तर कॉंग्रेसला 6 जागाच जिंकता आल्या.

शिवसेनेला एक जागेवरच समाधान मानावे लागले. भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी, खासदार हिना गावित यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती. या यशाचे श्रेय अजय परदेशी यांनी भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्तेना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com