पोटात नऊ महिने अडकलेला माशाचा काटा काढला बाहेर 

residenational photo
residenational photo

नाशिक : वृद्धाच्या पोटात जेवणातून गिळला गेलेला आणि तब्बल नऊ महिने आतड्यात अडकलेला माशाचा काटा डॉक्‍टरांनी दोन तास शस्त्रक्रिया करत यशस्वीरीत्या बाहेर काढला आणि असह्य पोटदुखीतून रुग्णाची सुटका करताना त्यांचे प्राणही वाचविले. गबाजी काशीराम वाघ (वय 67) असे या वृद्धाचे नाव आहे. या संदर्भातील माहिती शल्यचिकित्सक डॉ. सचिन देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
लॅपरोस्कोपिक व जनरल सर्जन डॉ. देवरे म्हणाले, की वाघ यांना दोन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने ते सुयश रुग्णालयाचे डॉ. यतींद्र दुबे यांच्याकडे उपचार घेत होते. सोनोग्राफीनंतरही त्यांच्या दुखण्याचे ठोस निदान होत नव्हते. पोटाच्या स्कॅनिंगमध्ये एक फुगासदृश वस्तू आढळल्याने त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. वाघ यांचे कळवणमधील पुतणे डॉ. तुषार वाघ यांच्या सल्ल्यानंतर ते डॉ. देवरेंकडे आले. पुन्हा एकदा स्कॅनिंग करून फुगासदृश वस्तूची खात्री करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. वाघ यांना मधुमेह, थॉयरॉइडचा त्रास होता. त्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्याने शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. यात डॉ. किरण पाटील व भूलतज्ज्ञ डॉ. राहुल वाघ यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया झाली. 
फुगासदृश वस्तू छेदल्यानंतर सुरवातीला एक कडक असा काडीसारखा पदार्थ आढळला. सक्‍शन पंपद्वारे सुमारे अडीचशे मिलिलिटर पू बाहेर काढण्यात आला. बराच काळ काटा रुतून राहिल्याने आत पू साचला होता. घट्टपणे रुतलेली काडीसदृश वस्तू बाहेर काढल्यानंतर ती माशाचा काटा असल्याचे निष्पन्न झाले. आवश्‍यक उपचारांनंतर वाघ यांची प्रकृती ठणठणीत झाल्याचे डॉ. देवरे यांनी सांगितले. 

लहान आतडे फाडून काटा पुढे सरकला 
अडीच इंच लांबीचा काटा लहान आतड्यालगतच्या पोटातील जागेत आढळला. लहान आतडे फाडून काटा बाहेर आलेला होता. एरवी लहान आतडे किंचितही पंक्‍चर झाले तरी काही मिनिटांतच रुग्णाला अत्यवस्थ वाटते. हा काटा चक्क आतडे फाडून पोटात आला होता. तरीदेखील आतड्याचे कार्य सुरळीत राहिल्याने डॉक्‍टरांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com