धुळ्यात कांदा प्रथमच प्रती क्विंटल सव्वीसशे

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

खानदेशातील शेतकर्‍यांची कांदा विक्रीची हमीची मार्केट म्हणून इंदौर ओळखले जाते. तिथे भाव चक्क हजारावर होते. विशेष म्हणजे आवकही धुळे बाजार समितीपेक्षा कमी होती. यात आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. पण तिथे शेतकरीच कांदा विक्रीस नेतात. व्यापारी नाही. शेतकर्‍यांकडे कांदे नसल्याने तिथे आवक नसल्याचे शेतकरी राजा पाटील यांनी सांगितले.

धुळे : धुळे बाजार समितीत आज कांद्यांची मोठी आवक वाढली. कालच्या बाराशे क्विंटलवरुन चौदाशे क्विंटलपर्यंत कांद्याची आवक झाली. आज भावही चांगला मिळाला. कालच्या पंधराशेवरुन चक्क सव्वीसशे पर्यंत प्रती क्विंटल भाव पोहचला. सरासरी दोन हजार पाचशेचा भाव मिळालाच. प्रथमच कांद्याची आवक वाढूनही भाव चक्क दीड पटीने वाढण्याची घटना प्रथमच घडली. कांद्याचे भाव वाढलेही असतील पण किती शेतकर्‍यांकडे कांदा शिल्लक आहे. हा संशोधनाचा विषय आहे. व्यापार्‍यांची चांदी होत असल्याचे शेतकर्‍यांमधून मते व्यक्त होत आहेत.

कांदा प्रथमच सव्वीसशेवर
गेल्या दोन वर्षांपासून कांद्याचे भाव नीचांकी पातळीवर होते. चालू आठवड्यात कांद्याने अचानक उसळी घेतली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पाचशे रुपये प्रती क्विंटल असणारा कांदा चालू आठवड्यात आठशे-पंधराशेवरुन आज चक्क सव्वीसशेवर भिडला. गेल्या दोन वर्षांत प्रथमच मोठी भाव वाढ झाली आहे. 

धुळे बाजार समितीत आज अठ्ठावीसशे गोण्यांची आवक झाली. काल सव्वीसशे गोणी आवक होती. कालचा भाव पंधराशे होता. आज आवक वाढूनही भाव दीड पटीने वाढल्याने शेतकर्‍यांनी आश्चर्य व्यक्त केले. एरवी आवक वाढल्यानंतर कांद्याचे भाव गडगडण्यासाठी धुळे बाजार समिती प्रसिध्द आहे. आज मात्र तसे झाले नाही. 

अहो आश्चर्यम.. इंदौरमध्ये भाव कमीच !
खानदेशातील शेतकर्‍यांची कांदा विक्रीची हमीची मार्केट म्हणून इंदौर ओळखले जाते. तिथे भाव चक्क हजारावर होते. विशेष म्हणजे आवकही धुळे बाजार समितीपेक्षा कमी होती. यात आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. पण तिथे शेतकरीच कांदा विक्रीस नेतात. व्यापारी नाही. शेतकर्‍यांकडे कांदे नसल्याने तिथे आवक नसल्याचे शेतकरी राजा पाटील यांनी सांगितले.

व्यापार्‍यांना अच्छे दिन
दोन वर्षांपासूनच्या सलग दुष्काळामुळे शेतकरी कांदा लगेच विकतात. कर्जबाजारीपणातून मोकळे होण्याचा प्रयत्न करतात. आताही उन्हाळ्यात व्यापार्‍यांना माल देऊन मोकळे झाले आहेत. आता बाजारात येणारा कांदा शेतकर्‍यांचा अल्प प्रमाणात आहे. व्यापार्‍यांचाच आहे. भाववाढीमुळे त्यांना 'अच्छे दिन' आले आहेत. 

दरम्यान कांदा भाववाढ येणार्‍या काही दिवसांमध्ये वाढतीच राहणार आहे. सोलापूर, पिंपळगावच्या बाजारातही मोठी तेजी आली आहे.

Web Title: marathi news marathi website Dhule Onion Market