आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत; सरकारला फाडून काढू : बच्चू कडू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

राज्यातील शेतकऱ्यांवर एक लाख 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जमाफी करताना 34 हजार कोटी रुपयांचीच केली. 80 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. ही कर्जमाफी नसून फसवणूक आहे.

नाशिक : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला; आमची फसवणूक सुरू ठेवल्यास आम्हीही फाडून काढू.. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. ज्या हातांनी मते दिली, त्या हातांत आता तलवारी घेतल्या जातील. आता 26 जुलै रोजी रेल्वे वाहतूक रोखणार', अशा भाषेत आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला आज (सोमवार) इशारा दिला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नाशिकमध्ये आज एल्गार सभा झाली. त्यात बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली. 

खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील रघुनाथदादा पाटील, डॉ. अजित नवले, योगेंद्र यादव या सभेला उपस्थित होते. 

रघुनाथदादा पाटील म्हणाले, "काँग्रेस आणि भाजप हे सख्खे भाऊ आहेत. कर्जमाफीमध्ये काँग्रेसने जमिनीची अट टाकली; तर भाजपने दीड लाख रुपयांची अट टाकले. दोन्ही वेळी पूर्ण कर्जमाफी झालीच नाही. औद्योगिक मालाला निर्यात बंदी नाही; पण कापूस, साखरेला निर्यात बंदी आहे. उद्योजक काय सरकारचे बाप आहेत का? स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के नफा मिळावा. रिलायन्स गॅसला सिलिंडरमागे 170 रुपये अनुदान देता, तसे साखर, तांदूळ, दुधासाठी गरिबांना खात्यावर महिन्याला पाच हजार रुपये द्या. पूर्ण न्याय मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचे सरकारविरुद्ध सुरू झालेले हे युद्ध थांबणार नाही.'' 

ही तर ऐतिहासिक फसवणूक.. 
''राज्य सरकारची ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात; पण ही ऐतिहासिक फसवणूक आहे' अशा शब्दांत डॉ. अजित नवले यांनी सरकारवर टीका केली. "राज्यातील शेतकऱ्यांवर एक लाख 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जमाफी करताना 34 हजार कोटी रुपयांचीच केली. 80 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. ही कर्जमाफी नसून फसवणूक आहे. सुकाणू समिती राज्यभरात 14 सभा घेणार आहे. 23 जुलै रोजी पुण्यात त्याचा समारोप होईल. त्यानंतर समितीची पुन्हा बैठक होईल आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरेल', असे डॉ. नवले यांनी सांगितले. 

इतर नेते म्हणाले.. 
योगेंद्र यादव : 

  • - निवडणुकीमध्ये मते मागताना नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के भाव देण्याचे वचन पूर्ण करावे. 
  • - 18 जुलै रोजी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णायक संघर्ष करणार 

व्ही. एम. सिंग : 

  • - 18 जुलै रोजी खासदार राजू शेट्टी संसदेत हा विषय मांडतील. 
  • - शेतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी दडपण वाढवावे लागेल