शिंदखेडामध्ये 'सुपर फास्ट' गाड्यांना थांबा द्या..! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

शिंदखेडा हे तालुक्‍याचे ठिकाण आहे. जवळपासच्या अंदाजे 140 गावांचा या स्थानकाशी संपर्क येतो. या स्थानकावर 'सुपर फास्ट' गाड्यांनाही थांबा मिळावा, अशी 2003 पासूनची प्रवाशांची मागणी प्रलंबित आहे. यासंदर्भात अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. अद्याप या प्रयत्नांना यश आलेले नाही.

शिंदखेडा (जि. धुळे) : येथील रेल्वे स्थानकावर 'नवजीवन', 'ताप्तीगंगा'यांसह 'प्रेरणा एक्‍सप्रेस'ला थांबा मिळावा, अशी मागणी शिंदखेडा प्रवासी संघर्ष समितीतर्फे रेल्वे व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे. येत्या शनिवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात 'सुपर फास्ट' गाड्यांना शिंदखेडाचा थांबा देऊन प्रभू भेट देतील, अशी अपेक्षा संघर्ष समितीतर्फे व्यक्त करण्यात आली. 

संघर्ष समितीने आज पत्रकार परिषद घेतली. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

शिंदखेडा हे तालुक्‍याचे ठिकाण आहे. जवळपासच्या अंदाजे 140 गावांचा या स्थानकाशी संपर्क येतो. या स्थानकावर 'सुपर फास्ट' गाड्यांनाही थांबा मिळावा, अशी 2003 पासूनची प्रवाशांची मागणी प्रलंबित आहे. यासंदर्भात अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. अद्याप या प्रयत्नांना यश आलेले नाही. 'या स्थानकावर 'सुपर फास्ट' गाड्याही थांबल्यास परराज्यातून शिरपूर येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच शिंदखेडा परिसरातील व शिरपूर तालुक्‍यासह मध्य प्रदेशातील अनेक गावांतील प्रवाशांना याचा फायदा होईल', अशी आशा या समितीला आहे. 

या स्थानकापासून काहीच अंतरावर जागतिक दर्जाची औद्योगिक वसाहत उभारली जात आहे. येथे रोजगार व व्यवसायासाठी येणाऱ्यांना शिंदखेडा रेल्वे स्थानक सोयीचे असणार आहे. येथे 'एक्‍सप्रेस' गाड्यांना थांबा दिला नाही, तर तीव्र 'रेल्वे रोको' आंदोलन केले जाईल, असा इशारा संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे. परिसरातील विविध संघटना, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

Web Title: marathi news marathi website Indian Railway Suresh Prabhu Dhule