तरवाडेत दारुमुळे तरुणाचा बळी 

बापू शिंदे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

तरवाडे (ता. चाळीसगाव) : गावात अनेक दिवसांपासून गावठी हातभट्ट्याची दारू बिनभोबाटपणे विकली जात आहे. ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या दारूविक्रीच्या विरोधात तक्रार करूनही कुठलीच कारवाई होत नाही. आज अति दारुच्या सेवनाने 42 वर्षीय गुरांचा डॉक्‍टर असलेल्या तरुणाचा बळी गेला. जिल्हा पोलिस अधीक्षकांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

तरवाडे (ता. चाळीसगाव) : गावात अनेक दिवसांपासून गावठी हातभट्ट्याची दारू बिनभोबाटपणे विकली जात आहे. ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या दारूविक्रीच्या विरोधात तक्रार करूनही कुठलीच कारवाई होत नाही. आज अति दारुच्या सेवनाने 42 वर्षीय गुरांचा डॉक्‍टर असलेल्या तरुणाचा बळी गेला. जिल्हा पोलिस अधीक्षकांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

तरवाडे गावात अनेक दिवसापासून साई मंदिरामुळे भाविकांची ये-जा वाढली आहे. ज्यामुळे जिल्ह्यात गावाचा लौकिक वाढला आहे. एकीकडे गावाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व वाढत असताना दुसरीकडे मात्र, 40 ते 45 गावठी, देशी व विदेशी दारूचे विक्रेते सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी शेजारील खरजई गावातील दोघांचा बळी गेला होता. काल(ता. 12) तिसरा तरवाडे येथील गुरांचे डॉक्‍टर भानुदास गायकवाड (वय 42 ) यांचे अति दारू सेवनाने फुफ्फुसे, मुत्रपिंड व यकृत खराब झाले. त्यांच्यावर चाळीसगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

काही दिवसांपूर्वी खरजई येथील एका 50 वर्षीय इसमाने आपल्या पत्नीजवळ दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, पत्नीने दिले नाहीत म्हणून पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. याच गावात दुसऱ्या घटनेत एक अविवाहित तरुण दारूसाठी आपल्या आईला त्रास देत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे, खरजई गावात सुमारे 17 वर्षांपासून दारूबंदी आहे. असे असतानाही केवळ तरवाडे गावात खुलेआम दारू विक्री होत असल्याने दोघांचा बळी गेला होता. 

तरवाडेतील दारूविक्री कायमची बंद करावी, यासाठी महिलांनी बऱ्याचदा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विनवण्या केल्या, निवेदने दिली. मात्र, तरीही काहीच फरक पडलेला नाही. उलट दारू विक्री करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. 

एकावर कारवाई
आठवड्यात ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कर्मचारी असलेल्या मद्यपीने अक्षरशः कळसच गाठला होता. दारूचे सेवन करुन त्याने सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांना भर गल्लीत शिवीगाळ सुरू केली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तक्रार देऊन त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. ग्रामपंचायतीने त्याची हकालपट्टीही केली. मात्र, तरीही दारू विक्री बंद झालेली नाही.

दारूमुळे गावातील शांतता व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. येथील ग्रामपंचायतीत पहिल्यांदा अकरापैकी आठ जागांवर महिला निवडून आल्या आहेत. मात्र, तरीही महिलांना दारू बंद करण्यात यश आलेले नाही. पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने महिलांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.