गरीबीमुळे तरूण शेतकर्‍याची आत्महत्या

एल. बी. चौधरी
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सोनगीर (जिल्हा धुळे) : घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची. अत्यल्प शेती. त्यातच पावसाअभावी उत्पादन नाही. शेतात व गावात कुठे काम नाही. या पार्श्वभूमीवर कुठेतरी काम मिळेल या आशेने व ठाम निर्णयाने तो घराबाहेर पडला. काम मिळेल का काम असेच जणू विचारत तो ठिकठिकाणी फिरला. जवळची औद्योगिक वसाहत पालथी घातली. पण कुठेही काम न मिळाल्याने अखेर नैराश्यातून त्याने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली.

गणेश प्रकाश जाधव (वय 22) (रा. वाघाडी खुर्द ता.शिंदखेडा) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आज विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. 

गणेश हा आई सुनंदा जाधव, वडील प्रकाश गंगाराम जाधव व लहान भाऊ दिनेश यांच्यासह राहत होता. गरीब परिस्थितीमुळे त्याला फारसे शिक्षण घेता आले नाही. स्वतःसह वडील, आई व भाऊ शेती व शेतमजूरी करून कसेतरी उदरनिर्वाह चालवत होते. गणेश अद्याप अविवाहित होता. यंदा पाऊस नसल्याने शेतात काम नाही. सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने कोणालाच काम नाही. मग खाणार काय? अशी स्थिती उद्भवली. 

गेल्या अनेक दिवसांपासून तो दुसरीकडे काम शोधावे, अशा विचारात होता. तसे तो घरातही सांगायचा. दोन सप्टेंबरला काम शोधण्यासाठी घराबाहेर पडला. सात-आठ दिवस झाले पण घरी परतला नाही, म्हणून शोधाशोध सुरू झाली. शेवटी नरडाणा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. पोलीस व नातेवाईकांनी बराच शोध घेतला. अखेर आज गावालगतच्या औद्योगिक वसाहतीतील (बाभळे एमआयडीसी) विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. 

एमआयडीसीत काम न मिळाल्याने नैराश्यातून त्याने विहीरीत उडी मारली असावी असे सांगितले जाते.

दरम्यान आज सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर नरडाणा येथे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.