शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत 'नमो- नमो'चा गजर 

शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत 'नमो- नमो'चा गजर 

शिंदखेडा : येथील नगरपंचायतीसाठी झालेल्या रोमहर्षक निवडणुकीत मतदारांनी 'नमो- नमो'चा गजर करत भाजपला विजयाचा कौल दिला. नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाच्या नऊ जागा मिळवीत भाजपने सत्ता परिवर्तन घडवून आणले.

काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरता धुव्वा उडला. प्रथमच समाजवादी पक्षाने दोन जागा मिळवत सत्तेत चंचू प्रवेश केला. 

भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे यांनी मतांमध्ये तीन हजाराच्या आघाडीने विजय मिळविला, तर त्यांचे पती अनिल वानखेडे यांच्याही गळ्यात मतदारांनी विजयाची माळ टाकली. विशेष म्हणजे एकेकाळी काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले वानखेडे यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करत हा निर्णय सार्थक ठरविल्याचे दाखवून दिले. भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेची जोड आणि आपल्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील या नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येण्यासाठी प्रयत्नशील रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कर्तबगारीतून पक्षाला परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळाल्याचे मानले जाते. 

काँग्रेस सत्तेपासून दूर 
शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (ता. 13) शांततेत 72.59 टक्के मतदान झाले. नंतर आज (गुरुवारी) सकाळी दहापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या उपस्थितीत शिंदखेडा तहसील कार्यालयात मतमोजणीस प्रारंभ झाला. शिंदखेडा नगरपंचायतीसाठी 17 प्रभागातून नगराध्यक्षपदासाठी चार, तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 69 उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या वानखेडे यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार मालती देशमुख, शिवसेनेच्या लता माळी आणि समाजवादी पक्षाच्या बिसमिल्लाबी गुलाम हुसेन यांचा पराभव केला. मतदारांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सोनाली भदाणे यांचा केवळ सात मतांनी पराभव झाला. समाजवादी पक्षाचे नेते विजयसिंह राजपूत यांना दोन जागांवर यश मिळाले. ते स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष केला. विजयी मिरवणुका निघाल्या. काँग्रेसच्या गोटात शांतता होती. या नगरपंचायतीच्या 2012- 2013 मधील निवडणुकीत शहर विकास आघाडीला आठ, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीला आठ, तर शिवसेनेला एक निर्णायक जागा मिळाली होती. 

विजयी उमेदवार असे :
भाजप- किसन जगन सकट, प्रकाश नागो देसले, अनिल लालचंद वानखेडे, भारती जितेंद्र जाधव, योगिता विनोद पाटील, वंदना चेतन गिरासे भिला बारकू माळी, नर्मदाबाई अर्जुन भिल, निर्मला युवराज माळी.
काँग्रेस- दीपक दशरथ भिल, संगिताबाई चंद्रकांत भिल, संगीता किरण थोरात, उदय अरुण देसले, सुनील बाजीराव चौधरी, मीरा मनोहर पाटील.
समाजवादी पक्ष- कुरेशी साजिदाबी शेक ईद्रीस, विजयसिंह नथेसिंह राजपूत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com