गिरणा पट्ट्यात वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

दीपक कच्छवा/शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मेहुणबारे/पिलखोड (ता.चाळीसगाव) : गिरणा पट्ट्यात सलग दुसर्‍या दिवशीही परतीच्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. परिसरात काल(ता. 8) रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. यात झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

मेहुणबारे/पिलखोड (ता.चाळीसगाव) : गिरणा पट्ट्यात सलग दुसर्‍या दिवशीही परतीच्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. परिसरात काल(ता. 8) रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. यात झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

मेहुणबारे येथे तासभर पाऊस
मेहुणबारेसह वरखेडे, तिरपोळे, दरेगाव या भागात सलग दुसऱ्या दिवशीही विजांच्या गडगडाटासह काल (ता. 8) रात्री साडेआठ वाजता एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. शनिवारी(ता. 7) झालेल्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे आद्यापही झालेले नाहीत. त्यामुळे आमदार उन्मेष पाटील यांनी दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

पिलखोडला अर्धातास पाऊस
पिलखोडसह परिसरात नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे पुन्हा कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. शनिवारी (ता.7) झालेल्या पावसामुळे आधीच कापूस जमिनीवर लोंबकळलेला होता. आज झालेल्या पावसामुळे पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. शिवाय मका, बाजरी व लिंबूच्या बागांचे नुकसान झाले आहे.

उंबरखेडला सलग दुसऱ्या दिवशी वीज कोसळली
उंबरखेड येथे शनिवारी(ता. 7) वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला. त्यात कालच्या वादळी पावसात काल(ता. 8) पुन्हा येथील मराठी शाळेजवळील विजयसिंह भिमसिंग पाटील यांच्या घरासमोरच असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे झाड जळाले आहे.

तिरपोळे येथे झाड कोसळले
तिरपोळे येथे काल (ता. 8) रात्री वादळी पावसामुळे गल्लीत झाड कोसळले. झाड विजेच्या खांबावर कोसळल्याने वरखेडेसह तिरपोळे परिसरात रात्रभर वीज गायब झाली होती.