आमचा मिलिंद देशासाठी हुतात्मा झाला याचा अभिमान

महेंद्र महाजन / दीपक कुलकर्णी
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

शेवटची भेट एप्रिलमध्ये अन्‌ बोलणे कालचे 
"मिलिंद 8 एप्रिलला सुटीवर आला असताना त्याची नाशिकमध्ये शेवटची भेट झाली होती. त्याने मुलांसाठी आम्हाला चंडीगडला बोलावले होते. त्या वेळी त्याने विमानाचे तिकीट दिले होते. काल (ता. 10) आम्ही रात्री नाशिकला पोचल्यावर नातू, सुनेशी मोबाईलवरून बोलणे झाले होते. त्यानंतर कालच रात्री साडेआठच्या सुमारास मोबाईलवरून मिलिंदचे शेवटचे बोलणे झाले.

नाशिक : "देशासाठी मिलिंद हुतात्मा झाल्याचा गर्व आहे,'' असे त्याचे वडील किशोर खैरनार यांनी सांगितले. तसेच, जवान तयार करण्यासाठी लागणारा वेळ अन्‌ पैशांचा विचार करता, केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करावा, अशीही अपेक्षा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त केली. 
उत्तर काश्‍मीरमधील बंदीपुरा येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये बोराळे (जि. नंदुरबार) येथील हवाई दलाच्या गरुड विभागातील सार्जंट मिलिंद किशोर खैरनार (वय 34) हुतात्मा झाले.

किशोर खैरनार हे महावितरणच्या साक्रीमधील कार्यालयातून वरिष्ठ यंत्रचालक म्हणून 2013 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर ते नाशिकमध्ये स्थायिक आहेत. खैरनार म्हणाले, "आज सकाळी दहाला मिलिंदच्या मित्राचा मोबाईलवर संपर्क झाला. त्याने मिलिंदला श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती दिली; पण तो मित्र हर्षदाच्या मोबाईलवरून बोलत असल्याने शंका आल्यावर तेथील एका व्यक्तीने मिलिंद हुतात्मा झाल्याची माहिती दिली आणि आम्हा पती-पत्नीच्या काळजाचा ठोका चुकला.'' मिलिंदची पत्नी हर्षदा, मुलगी वेदिका आणि मुलगा कृष्णा हे तिघेही चंडीगडमध्ये राहतात. वेदिका हवाई दलाच्या शाळेत शिकते. मिलिंद जम्मू- काश्‍मीरमध्ये तैनात आहे. मी पत्नीसह चंडीगडमध्येच होतो. कालच (ता. 10) चंडीगडहून नाशिकला परतलो, असेही त्यांनी सांगितले. 

शेवटची भेट एप्रिलमध्ये अन्‌ बोलणे कालचे 
"मिलिंद 8 एप्रिलला सुटीवर आला असताना त्याची नाशिकमध्ये शेवटची भेट झाली होती. त्याने मुलांसाठी आम्हाला चंडीगडला बोलावले होते. त्या वेळी त्याने विमानाचे तिकीट दिले होते. काल (ता. 10) आम्ही रात्री नाशिकला पोचल्यावर नातू, सुनेशी मोबाईलवरून बोलणे झाले होते. त्यानंतर कालच रात्री साडेआठच्या सुमारास मोबाईलवरून मिलिंदचे शेवटचे बोलणे झाले. एप्रिलमधील मिलिंदची शेवटची भेट आणि काल रात्रीचे शेवटचे बोलणे झाले,'' असे खैरनार यांनी अश्रू आवरत सांगितले. हे सारे बोलणे सुरू असताना मिलिंद यांचे सख्खे मामा आणि सासरे प्रदीप बन्सीलाल जगताप हे शिरपूरहून निवासस्थानी पोचले होते. विरदेल (ता. सिंदखेडा) येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. जगताप हे धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेत आहेत. हर्षदा ही त्यांची मोठी कन्या आणि मनीष हा धाकटा मुलगा. हर्षदाचे भाऊ मनीष जगताप हे पत्नीसमवेत मिलिंद यांचे पार्थिव आणण्यासाठी चंडीगडला गेले आहेत. 

"ऑपरेशन सक्‍सेस' 
मिलिंद धुळ्यातील एसएसव्हीपीएस कॉलेजमध्ये शिकत असताना त्याने हवाई दलाच्या सेवेसाठी अर्ज केला होता. "विदाउट लिव्ह अँड 24 अवर्स्‌' या तत्त्वावर तो काश्‍मीरमध्ये ऑगस्टपासून देशसेवेत होता. त्याची ही सेवा जानेवारी 2018 पर्यंत होती. मुंबईवरील 26-11 च्या अतिरेक्‍यांच्या हल्ल्यावेळी मुंबईला जावे लागेल, असा मिलिंदचा फोन आला होता. त्यानंतर त्याचा "ऑपरेशन सक्‍सेस' असा "एसएमएस' आला होता. मुंबईवरील हल्ल्यावेळी हेलिकॉप्टरने नरिमन हाउसवर उतरलेल्या तीन कमांडोंत मिलिंदचा समावेश होता, अशी माहिती किशोर खैरनार यांनी दिली. 

मिलिंदची पत्नी हर्षदा ही उच्चशिक्षित असल्याने ती सैन्यदलात दाखल होऊ शकते, त्यासाठी आमचे पाठबळ राहील. 
- किशोर खैरनार, हुतात्मा मिलिंद यांचे वडील 

विमानाने पार्थिव आज ओझरला 
चंडीगडहून मिलिंद खैरनार यांचे पार्थिव सैन्य दलाच्या विमानाने आज गुरुवारी (ता. 12) सकाळी ओझर विमानतळावर आणल्यावर या ठिकाणी सरकारतर्फे पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी लष्करी इतमामात वायुसेनेच्या अधिकाऱयांकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक संजय दराडे, हुतात्मा जवानाचे बंधू मनोज खैरनार यांच्याकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सैन्य दलाच्या खास वाहनाने पार्थिव बोराळे (जि. नंदुरबार) या त्यांच्या मूळ गावाकडे रवाना झाले. बोराळा येथे त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :