विंचूरमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

विंचूर (नाशिक) : येथील परिसरात काल (शुक्रवार) मध्यरात्री तीन वस्तींवर चोरट्यांनी धारदार हत्यारांचा धाक दाखवून अंदाजे दहा तोळे सोने व नव्वद हजार रोख असा ऐवज लुटला. 

विंचूर (नाशिक) : येथील परिसरात काल (शुक्रवार) मध्यरात्री तीन वस्तींवर चोरट्यांनी धारदार हत्यारांचा धाक दाखवून अंदाजे दहा तोळे सोने व नव्वद हजार रोख असा ऐवज लुटला. 

येथील येवला रोडवरील स्वामी समर्थ नगरमध्ये राहत असलेल्या अरुण ढोमसे यांच्या घरी चोरट्यांनी रात्री 12.30 च्या सुमारास घरामागील दाराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. झोपेत असलेल्या ढोमसे यांच्या गळ्याला धारदार हत्यार लावून चोरट्यांनी घरातील ऐवज लुटला. या घरातून रोख तेराशे रुपये आणि अंगावरील दागिने असे दोन तोळे सोने चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. त्यानंतर त्या चोरांनी 'आकाश' आणि 'सुमंगल नगर'मध्ये चोरीचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. 

दरम्यान ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी परिसरात चोरांचा मागोवा घेण्यास सुरवात केली. तोपर्यंत चोरांनी तिथून पळ काढून मरळगोई रस्त्यालगत राहत असलेल्या माजी सरपंच शकुंतला दरेकर यांच्या घरात मागील दाराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. रत्नाकर दरेकर यांच्या मानेला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिली. द्राक्ष बागेच्या मजुरी आणि औषधासाठी घरात असलेले 90 हजार रुपये आणि महिलांच्या अंगावरील सुमारे आठ तोळ्यांचे सोने त्या चोरांनी लुटले. या वेळी चोरांशी झालेल्या झटापटीत रत्नाकर दरेकर यांच्या उजव्या खांद्यास दुखापत झाली. 

यानंतर चोरांनी गोविंद शिवराम दरेकर यांच्या वस्तीकडे मोर्चा वळविला. त्यांच्याही घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरच्यांना धमकाविले. या घरातून त्यांनी पाच हजार रुपये आणि मोबाईल फोन लुटला. तोपर्यंत दरेकर यांची मुलगी सोनाली हिने घरातून पळ काढला आणि शेजारच्या वस्तीवरील लोकांना जागे केले. हे चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी शेतातून पळ काढला. 

चोरट्यांचा शोध घेत असताना येवला रोडवर पोलिसांना एक संशयित तवेरा गाडी आढळून आली. संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीत अधिकारी दीपक गिर्हे, ठसा तज्ज्ञ माळोदकर, शिरोळे, अमृतकर, गवळी, चारोसकर यांनी भेट दिली. पुढील तपास लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक दिनकर मुंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक उदय मोहारे, पोलिस हवालदार योगेश शिंदे करत आहेत.