'कांदा उत्पादकांची अडवणूक थांबवा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नाशिक : कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. व्यापाऱ्यांनी सोमवार (ता. 18) पासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करावेत. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी आज सर्व बाजार समित्यांना नोटिसा पाठवून लिलाव सुरू करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. 

कांद्याला चांगले भाव मिळत असताना कांदा व्यापाऱ्यांवर छापे सुरू झाले आहेत. भाव पाडण्यासाठी हे छापे सुरू झाल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. तर, कांदा साठेबाजीला आवर घालण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून छापे सुरू असल्याचा प्रशासकीय दावा आहे. पण, शासकीय छापे आणि व्यापाऱ्यांच्या साठमारीत व्यापाऱ्यांनी लिलावच बंद केल्याने 
कांदा उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत.

लिलाव बंद असल्यामुळे व कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. खासदार हेमंत गोडसे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यातून मार्ग काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी, सहनिबंधक निळकंठ करे व जिल्हा पणन अधिकारी दिग्विजय आहेर यांच्याशी संर्पक साधून कांदाप्रश्‍नी शेतकऱ्यांची सुरू असलेली अडवणूक त्वरित थांबविण्याच्या सूचना दिल्या. 

बाजार समित्यांना नोटिसा 
जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी आज जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. कांद्याचे लिलाव सोमवारी कुठल्याही परिस्थितीत सुरू झाले पाहिजेत. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, असे आदेश बाजार समित्यांना दिले आहेत.