अमेरिकेच्या उटाह विद्यापीठाला नाशिकच्या वंशावळींची भुरळ 

residenational photo
residenational photo

नाशिक ः सिंहस्थ कुंभमेळा भरणाऱ्या नाशिकचे धार्मिक, पौराणिक स्थान अद्वितीयच. हे अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी सिद्धही झाले आहे. या नगरीत होणाऱ्या पारंगत वेदविद्या, धार्मिक विधींची ख्याती जगभर पसरलेली असल्याने अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे येथील पुरोहित, उपाध्येंशी जोडली गेली आहेत. किंबहुना आपल्या उपाध्यांकडेच असे विधी करायला प्राधान्य देतात. अशा जगभरातील कुटुंबांचा ठेवा "वंशावळी'च्या माध्यमातून पुरोहित, उपाध्यांकडे उपलब्ध आहे.

याच वंशावळीच्या अनमोल ठेव्याची मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या उटाह विद्यापीठातील तज्ज्ञांनाही भुरळ पडली. नाशिकला येऊन त्यांनी अभ्यास संशोधनासाठी मायक्रोफिल्मिंगद्वारे सर्व वंशावळी एकत्र करून घेऊन गेले. पुरोहित, उपाध्येंच्या दृष्टीने आनंद द्विगुणित करणारा असाच हा क्षण म्हणता येईल. 
पुरोहित, उपाध्यांकडे उपलब्ध असलेली "वंशावळ' म्हणजे त्यांच्यासाठी एक अनमोल ठेवा आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून त्यांनी हा ठेवा जतन केला आहे.

नाव, गाव, वंश, परिवार, पिढीजात कुटुंब, त्यातील सदस्य यांसारख्या एक नव्हे, असंख्य बाबी वेगवेगळ्या परिवारांशी संबंधित त्यात नमूद आहे. केवळ ठराविक प्रांताच्याच नव्हे, तर जगभरातील अनेक कुटुंबांची माहिती या वंशावळीत दिलेली आहे. व्यवसायांशी निगडित असणाऱ्या या माहितीतून पुरोहित, उपाध्ये अशा परिवारांशी पूर्वजांपासून जोडले गेले आहेत. नाशिकमध्ये सुमारे साडेतीनशे तीर्थपुरोहितांची घराणी आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे वंशावळी किंवा नामावली जतन केलेली आपल्याला पाहायला मिळते. 

वंशावळींचे मोल अनमोल 

वेदविद्या, पौराणिक, धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असणारी ही कागदपत्रे आपल्याला त्यात पाहायला मिळतात. प्रत्येक घराण्याचे वेगवेगळे उपाध्येही ठरलेले आहेत. नाशिकला आल्यावर पूर्वजांची नावे, स्वाक्षरी पाहिल्यावर हेच आपले पुरोहित आहेत, याची खात्री संबंधित परिवारांना होते. ते त्या तीर्थपुरोहितांना आपले उपाध्ये मानतात. ही परंपरा जुनी आहे. त्यामुळेच वंशावळीला अगदी जिवापेक्षाही अधिक जपले जाते. 

प्रांतापलीकडे अन्‌ महनीय कुटुंबांच्या नोंदी 

या वंशावळीचे वेगळे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. काबूल, कंदहार (अफगाणिस्तान), सिंध प्रांत (पाकिस्तान), हिमाचल प्रदेश, म्यानमार, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तराखंड व काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या प्रांतातील सर्व गावांतील भाविकांच्या "वंशावळी' आजही उपलब्ध आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे व त्यांचे पूर्वज ते आजपर्यंतच्या सर्व पिढ्यांची नोंद वंशावळीत पाहावयास मिळते. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, काश्‍मीरचे महाराजा हरिसिंग व त्यांचे पूर्वज यांची नोंद आहे. उद्योगपती टाटा, बिर्ला, अंबानी, दालमिया, खेतान या घराण्यांच्या पूर्वजांचे लेख पाहायला मिळाल्यानंतर आताची पिढी आपले पूर्वज भेटल्याचा आनंद व्यक्त करतात. 

आताच्या पिढीसाठी उपयुक्त 
काही वेळा त्यांचे हस्ताक्षर व स्वाक्षरी पाहून ती वंशावळ कपाळाला लावतात. आताच्या पिढीला आजोबा, पणजोबा याआधीच्या पिढीची माहिती नसते. ती माहिती या वंशावळीतून मिळते. सुमारे 17 ते 18 पिढ्यांपर्यंत माहिती या वंशावळीतून मिळू शकते. 

जीवापेक्षाही अधिक जपवणूक, योग्य मोबदला 

वंशावळींसाठी लागणारा कागद हा हॅन्डमेड असतो. तो टिकाऊ असल्याने त्याचा वापर केला गेला आहे. हा कागद जुन्नर, पुणे भागात तयार होते. त्यावर लिहिण्यासाठी जी शाई वापरली गेली, ती घरी तयार केलेली असते. त्यामुळे वंशावळ जरी पाण्याने भिजली तरी अक्षरांवर फारसा परिणाम होत नाही. सध्या काही पुरोहित व उपाध्ये यांनी या वंशावळींचे "डिजिटायझेशन' केले आहे. काही जण करत आहेत. त्यात पाराशरे, शिंगणे यांच्याकडील वंशावळींचे "डिजिटायझेशन' पूर्ण झाले आहे. वंशावळी हाताळताना काळजी घ्यावी लागते. योग्य ठिकाणी ठेवल्यावर झुरळ, वाळवी लागणार नाही, याची दक्षता सारेच घेतात. अमेरिकेतील उटाह विद्यापीठाने विविध घराण्यांच्या उपाध्येंकडील नामावलीच्या पानांचे मायक्रोफिल्मिंग करून घेतले. त्यासाठी या विद्यापीठाकडून एका पानाला एक रुपया याप्रमाणे रक्कमही मिळाली आहे. त्यासाठी सुमारे 80 हजारांपासून दीड लाखापर्यंतची रक्कम उपाध्येंना मिळाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com