रेल्वेबोगीत सोडली सात महिन्याची बालिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

तळोदा : नंदूरबार येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजर गाडीत आपल्या सात महिन्याच्या बालिकेस बेवारस सोडून दुसऱ्या गाडीने आईने पलायन केल्याची घटना घडली. या बालिकेला बाल कल्याण समितीने औरंगाबाद येथील शिशुगृहात दाखल केले. 

तळोदा : नंदूरबार येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजर गाडीत आपल्या सात महिन्याच्या बालिकेस बेवारस सोडून दुसऱ्या गाडीने आईने पलायन केल्याची घटना घडली. या बालिकेला बाल कल्याण समितीने औरंगाबाद येथील शिशुगृहात दाखल केले. 

नंदुरबार रेल्वे स्थानकात 12 एप्रिलला दुपारी अडीचच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर सुरत भुसावळ पॅसेंजर उभी होती. तिच्या बोगी क्रमांक चारमध्ये सुमारे सात महिन्याची बालिका रेल्वे प्रवाशांना जोरजोरात रडत असल्याची दिसली. त्या बालिके जवळपास कोणीही नसल्याने एका प्रवाशाने गार्ड संदीप तायडे यांना त्याबाबत माहिती दिली. गार्ड संदीप तायडे यांनी ही बाब स्टेशन मास्तरच्या निदर्शनास आणून दिली. स्टेशन मास्तरने रेल्वे पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले. त्याठिकाणी बालिकेची आई अथवा कोणतेही पालक आढळून आले नाहीत. इतर प्रवाशांना विचारणा केली असता या बलिकेची आई ही बालिकेस येथेच टाकून सुरतकडे जाणाऱ्या रेल्वेत बसून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बालिकेस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

रुग्णालयात तिच्यावर डॉ. दिनेश सूर्यवंशी, नीलिमा वळवी यांनी उपचार केले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांनी सात महिन्याची बालिका रेल्वेत बेवारस सापडल्याची माहिती जिल्हा बाल कल्याण समितीला कळवली. त्यानंतर बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. परिस्थितीची माहिती करून घेतली. आवश्‍यक शासकीय सोपस्कार पार पाडले. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांवर बालिकेचे नामकरण परी असे करून तिला औरंगाबाद येथील साकार शिशुगृहात दाखल केले.

Web Title: marathi news nandurbar realway girl child