भाजपाची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद!

halla-bol-aandolan
halla-bol-aandolan

येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनात शुक्रवारी मुंडे बोलत होते.

सरकारने १२५कोटी जनतेचा विश्वासघात केला असून, त्या विरोधात राष्ट्रवादीचा हा हल्लाबोल असल्याचेही ते म्हणाले. शनी पटांगण येथे झालेल्या सभेला पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री शशिकांत शिंदे, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, आमदार पंकज भुजबळ, हेमंत टकले आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून झालेल्या नियोजनामुळे या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.

कांतीनगरीत क्रांती सूर्याच्या गैरहजरीत ही सभा होत असल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त करून येणारी सभा भुजबळांच्या उपस्थितीतच होईल असा आशा मुंडे यांनी व्यक्त केली. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने या देशातील जनतेची उघड फसवणूक चालवली असून, यामुळेच आता लोक फडणवीसांना ''फसणवीस'' म्हणू लागले असल्याचे मुंडे म्हणाले. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा होतील असे प्रचारात सांगणाऱ्या मोदींच्या कालखंडात मात्र ललित मोदी, विजय मल्ल्या, निरव मोदी असे एक एक जण पैसे घेऊन पलायन करत आहे. जनतेची दिशाभूल करणाऱया या सरकारला पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मागे हटणार नाही, सरसकट कर्जमाफी, शेतमालाला भाव, बेरोजगारांना नोकऱ्या यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहू असे मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दंतकथात रमलेले सरकार - सुळे
 मोदी सरकार हे दंतकथात रमलेले सरकार असल्याने आमच्यावर हल्लाबोल करण्याची वेळ आली आहे. दोन गोष्टी कमी केल्या तरी चालतील पण त्या खऱ्या करा अशी आमची शिकवण असल्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या वेळी म्हणाल्या. माझ्यासाठी येवला माहेर आहे कारण भुजबळ साहेबांनी माझ्यावर लेकी सारखे प्रेम केले आहे. त्यामुळे मागील बावीस महिन्यांपासून आम्हीचीही अस्वस्थता होत आहे. आता गप्प आहोत कारण प्रकरण न्यायालयात आहे, मात्र वेळ आल्यावर महाराष्ट्रातली जनता आणि नियती हे कृत्य करणाऱ्यांना माफ करणार नाही असे खडे बोलही भुजबळांचा संदर्भात सुळे यांनी सुनावले. या सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. डिजिटलच्या मागे धावल्याने पोट भरत नाही त्यासाठी भाकरी लागते हे यांना कोणी सांगावे असा सवाल करून कांदा जाळण्याची वेळ या सरकारने या येवल्यातील शेतकऱ्यांवर आणली होती अशी टीकाही त्यांनी केली. मात्र रडवणाऱ्या कांद्याच्या नादी या सरकारने लागू नये असेही सुळे गंभीरतेने म्हणाल्या. स्वतःच्या गुजरातमधील जनतेने कॉपी करून यांना काठावर पास केले आहे. आता महाराष्ट्रातली जनता वैतागलेली असल्याने यांना कॉपी करून काठावर देखील पास होता येणार नाही हे चित्र आजच दिसते आहे असे स्पष्ट करत भुजबळांनी काहीही केलेले नाही, मार्ग काढा न्याय द्या, नाहीतर काय ते बघू असा स्पष्ट इशारा देत २०‍१९ला भुजबळांच्या प्रचाराला पुन्हा इथे येतील असे भाषणाच्या शेवटी त्या म्हणाल्या.

भुजबळांना तुरुंगात टाकणार्‍या फडणवीस सरकारवर टिका करताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर 'हुशार' फडणवीसांनी खडसेंना मंत्रीमंडळातुन बाहेर काढले. आज मंत्रीमंडळातील १२ मंत्र्यांवर आरोप असतांना त्यांना मात्र क्लीनचिट देण्याचे काम फडणवीसांनी केले. 

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारला टाळ्यावर आणण्यासाठीच हल्लाबोल मोर्चाचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले असून, हा हल्लाबोल वंचित शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी, महिलांना सुरक्षीत ठेवण्यासाठी, शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव देण्यासाठी, असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक, आमदार जितेंद्र आव्हाड, राज्य पणन कापूस महामंडाळाच्या अध्यक्षा उषाताई शिंदे, आमदार पंकज भुजबळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे आदींचे सरकारवर टिका करणारे भाषणे झाली. 

प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस ऍड. माणिकराव शिंदे यांनी केले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी आमदार हेमंत टकले, जयवंत जाधव, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, देवीदास पिंगळे, दिलीप बनकर, श्रीराम शेटे, विष्णूपंत म्हेसधुणे, पंढरीनाथ थोरे, अमृता पवार ,रंजन ठाकरे, भारती पवार, गटनेते डॉ. संकेत शिंदे, सचिन शिंदे, अकबर शहा, प्रवीण बनकर, दीपक लोणारी, शामा 
श्रीश्रीमाळ, साहेबराव मढवई, वसंतराव पवार, निसार लिंबूवाले मुश्रीफ शहा, भागुनाथ उशीर, प्रकाश वाघ, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, प्रदिप सोनवणे, गणपत कांदळकर, हुसेन शेख, मुशरिफ शाह आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

अजितदादांची अनुपस्थिती चर्चेची
आजच्या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रमुख वक्ते असल्याने त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांविषयी ते काय बोलणार याचे कुतूहल असताना अचानकपणे त्यांची सभेला दिसलेली अनुपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. किमान अनेकांनी तर दिवसभरात झालेल्या सभेच्या ठिकाणी चौकशी करून दादा होते की नव्हते याची माहिती घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com