समाजाच्या हितासाठी वैद्यकीय व्यावसायिकांनी ठरवावी नित्तीमत्ता: डॉ. बंग

nashik
nashik

नाशिक : अमेरिकेची आरोग्यसेवा आपल्यासाठी उपयुक्त मॉडेल नाही. तसेच देशातील 93 टक्के लोक डॉक्‍टर आणि रुग्णालयावर विश्‍वास ठेवत नाहीत असे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एवढेच नव्हे, तर स्वतःच न्यायाधीश आणि आपल्याच न्याय या तत्वावर वागणाऱ्या वैद्यकीय परिषद रुपी "खापपंचायत'ने वैद्यकीय व्यवसायाची नित्तीमत्ता घसरणीला लावली. हा सारा पट मांडत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी आज येथे समाजाच्या आणि स्वतःच्या व्यवसायाच्या हितासाठी खासगी व सरकारी डॉक्‍टरांना एकत्र आणून वैद्यकीय नित्तीमत्ता ठरवावी असे प्रतिपादन केले.

देशात सतराशे, तर अमेरिकेत शंभर लोकसंख्येमागे एक डॉक्‍टर आहेत. ही परिस्थिती दूर करण्यासाठी सरकारी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्‍टरांना डॉ. बंग यांनी आपल्या उत्पन्नातील एक टक्का रक्कम परत देण्याचे आवाहन केले.

त्याचप्रमाणे या रकमेच्या वैद्यकीय ऋतज्ञता निधीतून पुढील पिढीतील तरुणांच्या वैद्यकीय शिक्षणाची व्यवस्था करावी असेही त्यांनी अधोरेखित केले. सार्वजनिक वाचनालयाचा ज्येष्ठ समाजवादीनेते माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना डॉ बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष ऍड्‌. अभिजित बगदे, डॉ. विनायक आणि डॉ. शोभाताई नेर्लीकर, पुरस्कार निवड समितीचे शैलेंद्र तनपुरे, ऍड्‌. भानूदास शौचे आदी उपस्थित होते.

महाजनांचे आरोग्य अन्‌ जीवनशैलीचे उत्कृष्ट कार्य
श्री. महाजन यांचे आरोग्य आणि जीवनशैली चांगली आहे. वैद्यकीय शिक्षणात भ्रष्टाचाराला वाव असतानाही मंत्री म्हणून त्यांनी पै चा देखील गैरव्यवहार केला नाही. लाखो जनतेसाठी ते आरोग्य शिबिर घेताहेत. हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या खऱ्या नेतृत्वाची चिन्हे आहेत, असे गौरवोद्‌गार काढून डॉ. बंग यांनी वैद्यकीय व्यवसायाबद्दलची व्यथा मांडली. ते म्हणाले, की भारतीय वैद्यकीय परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष केतन देसाई यांच्यावरील छाप्यात 200 कोटी आणि 17 किलो सोने सापडले. तरीही तत्कालिन शंभर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांनी निवेदन देऊन सरकारला देसाईंच्या पुनर्स्थापनेची मागणी केली होती. खरे म्हणजे, वैद्यकीय व्यवसायाची इतकी वाईट अवस्था यापूर्वी कधी झाली नाही. डॉक्‍टर आणि रुग्णालयांवर हल्ले होत असून गुन्हे दाखल होत आहेत. खरेदी बिलांच्या आरोपांचे न्यायालयात गुन्हे दाखल झाले आहे. जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार देशातील सहा कोटी जनतेला वैद्यकीय खर्चासाठी दारिद्य्र रेषेखाली जावे लागत आहे. 60 टक्के चांगले डॉक्‍टर असतानाही डॉक्‍टर गरिबी निर्मितीस कारणीभूत ठरत आहेत. ही सारी परिस्थिती रोखण्यासाठी उच्चशिक्षित डॉक्‍टरांनी निवडणूक पद्धतीने आपले सक्षम नेतृत्व निवडायला हवे.

पुरस्काराने आणखी चांगल्या कामाची जबाबदारी
बाहेरचा पालकमंत्री असतानाही विश्‍वास दाखवल्याने नाशिककरांचे आभार मानत श्री. महाजन यांनी पुरस्काराने आणखी चांगल्या कामाची जबाबदारी वाढल्याचे नमूद केले. 178 वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण अशा महनीय व्यक्तीमत्वानी भेट दिली आहे. 

नाशिकच्या संस्कृतीत वाचनालयाने मानाचा तुरा खोचला आहे, असे सांगून श्री. महाजन यांनी मद्याला महिलांचे नाव देण्याच्या संबंधाने गंमतीने केलेल्या वक्तव्याबद्दल झालेल्या गदारोळ विषयक जाहीर माफी मागितली. एखादा शब्द इकडे-तिकडे झाल्यास बॅंड वाजतो असे सांगून त्यांनी नरभक्षक बिबट्याच्या त्रासातून मुक्तता मिळावी म्हणून उस्फुर्तपणे त्याच्या मागे धावल्याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की आपल्या वागण्यातून कसलाही वेगळा भाव नसतो. मात्र मागे राह्यचे नाही हा स्वभाव आहे. आपली किंमत कामातून वाढते यावर नितांत श्रद्धा आहे. मी जिथे उभा राहतो तिथं कार्यालय सुरु होते. तसेच राज्यातील वाचनालये आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. 

ग्रंथालय चळवळीला आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसाठी मदत करावी. महाराष्ट्रातील एकही पुस्तकाचे दुकान बंद होणार नाही आणि भिलारसारखी पुस्तकांची गावे होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशा अपेक्षा श्री. बेणी यांनी मांडल्या. ऍड्‌. बगदे, डॉ. नेर्लीकर यांची भाषणे झाली. ऍड्‌. शौचे यांनी सूत्रसंचालन केले. महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, सुरेशबाबा पाटील, लक्ष्मण सावजी, संभाजी मोरुस्कर, दादाजी जाधव यांनी श्री. महाजन यांचे नाशिककरांतर्फे अभिनंदन केले.

"मद्य, तंबाखू, बाजारात विकले जाणारे गोडपदार्थ, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड रोगनिर्मिती करु लागलेत. 30 वर्षाहून अधिक वयामध्ये 25 टक्के जणांना उच्चरक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे आता डॉक्‍टर अथवा रुग्णालयावर अवलंबून राहण्याऐवजी प्रत्येकाने आरोग्य स्वराज्य मिळवून जीवनात स्वस्थ व्हायला हवे.''
- पद्मश्री डॉ. अभय बंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com