नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात संततधार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात आज पहाटेपासून दिवसभर आर्द्रा नक्षत्राच्या संततधारेने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भाताच्या दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरी समाधानी आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजच्या पावसामुळे पश्‍चिम पट्ट्यासह येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव व मालेगाव या तालुक्‍यांच्या पूर्व भागातही पेरणीला जीवदान मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. हवामान पूर्वानुमान विभागाने सायंकाळी साडेसातला दिलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात काही भागात उद्या (ता. 25) सकाळी साडेसातपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात 1 जूनपासून बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर 20 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने पश्‍चिम पट्ट्यात भाताची रोपे टाकली होती, तर पूर्व भागात कपाशीच्या धूळ पेरणीसह बाजरीची पेरणी केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने या पिकांना पावसाची ओढ लागली होती.

पूर्व भागात तर अगदी मे महिन्यासारखे उन पडू लागल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे; परंतु आज पहाटेपासून पश्‍चिम पट्ट्यात आर्द्राच्या पावसाने जोरदार सुरवात केल्यामुळे आवणे पाण्याने तुडुंब भरली असून, भातरोपांना जीवदान मिळाले आहे. त्र्यंबकेश्‍वर, पेठ, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, इगतपुरी व नाशिक या तालुक्‍यांत पहाटेपासून संततधार सुरू असून, अनेक ठिकाणी नाल्यांना पूर आला आहे. शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे आणखी आठवडाभरात या भागात भाताच्या लागवडीला सुरवात होऊ शकते. या तालुक्‍यांना लागून असलेल्या निफाड, सिन्नर, चांदवड, देवळा व बागलाण या पश्‍चिम पट्ट्यातही दिवसभर अधूनमधून हलक्‍या सरी कोसळत असल्याने तेथील शेतीकामांनाही वेग येणार आहे. 

दुबार पेरणीचे संकट टळले 
जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने खरिपाच्या पेरण्यांना ब्रेक लागला होता. आज सकाळी सात ते सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दिवसभरात चांदवड, नांदगाव, मालेगावला मात्र पावसाने कोरडेच ठेवले. आजचा पाऊस प्रामुख्याने पश्‍चिम पट्ट्यावर मेहेरबान झाल्याने पुन्हा एकदा खरिपात उत्साह संचारला आहे. दुबार पेरणीचे संकटही दूर झाले आहे. 

गंगापूरमध्ये आले 33 दलघफू पाणी 
त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात पहाटेपासून संततधार सुरू असल्याने ब्रह्मगिरी व परिसरातील डोंगररांगांवरील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे गंगापूर धरणात 33 दशलक्ष घनफूट साठा वाढल्याचे जलसंपदा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस असा : नाशिक 42 मिलिमीटर, इगतपुरी- 157, त्र्यंबकेश्‍वर- 120, दिंडोरी- 13, पेठ- 62, निफाड- 8, सिन्नर- 24, देवळा- 8, येवला- 1, बागलाण- 1, कळवण- 16, तर सुरगाणा- 76 मिलिमीटर पाऊस झाला. 

आणखी चार दिवस जोर 
हवामान पूर्वानुमान विभागाने उत्तर व मध्य महाराष्ट्रात 28 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या काही भागांत पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे मुंबई वेधशाळेने कळविले आहे. 

नाशिकमध्ये संततधार 
नाशिक शहर व तालुक्‍यात आज दिवसभर संततधार सुरू होती. शहरात पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम होता. बेमोसमी पावसानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाच्या जोरदार आगमनामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सायंकाळी पाचपर्यंतचा पाऊस (मिलिमीटर) 

  • गंगापूर धरण परिसर : 133 
  • काश्‍यपी धरण परिसर : 45 
  • त्र्यंबकेश्‍वर : 120 
  • आंबोली परिसर : 70